भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गोल्डन नेस्ट येथील बाळासाहेब ठाकरे कला दालनात अभ्यासिका केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. यामुळे शहरातील विद्यार्थांना अभ्यास करण्यासाठीची सुविधा उपलब्ध झाली आहे.
मिरा-भाईंदर शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. हे विद्यार्थी महापालिकेच्या वाचनालयात अभ्यास करत असतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा असलेले अभ्यास केंद्र उभारण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शासनाकडे केली होती. त्यानुसार हे अभ्यास केंद्र भाईंदर पूर्व येथील बाळासाहेब ठाकरे कला दालनात उभारण्याचे निश्चित करण्यात आले होते.
यासाठी शासनाने ५ कोटींचा निधी मंजूर केला होता.त्यानुसार या केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.दरम्यान ५ नोव्हेंबर रोजी पद्मश्री वासुदेव कामत यांच्या उपस्थितीत मंत्री प्रताप सरनाईक यांनी केंद्राचे लोकार्पण केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती.
या अभ्यासिका केंद्रामध्ये आधुनिक अभ्यास सुविधा, ग्रंथालय, डिजिटल लायब्ररी आणि मार्गदर्शन केंद्राची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.याशिवाय भविष्यात या ठिकाणी आवश्यक असलेल्या साहित्याची उभारणी करण्यासाठी महापालिकेकडून खर्च केला जाणार आहे
विद्यार्थांना मोठा फायदा
या अभ्यासिका केंद्रामुळे विद्यार्थ्यांना अनेक प्रकारे फायदा होणार आहे.अभ्यासासाठी शांत, सुसज्ज आणि प्रेरणादायी वातावरण उपलब्ध होणार आहे.याशिवाय केंद्रात स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक संदर्भग्रंथ आणि ऑनलाइन साहित्य असलेले ग्रंथालय व डिजिटल लायब्ररीची सोय करण्यात आली आहे. तसेच तज्ज्ञांकडून करिअर आणि अभ्यास मार्गदर्शनाची संधीही विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
