वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वर्सोवा पुलाच्या सुरत – मुंबई मार्गिकेला सुरू करण्यास विलंब होत असल्याने स्थानिकांनीच ही मार्गिका खुली केली. शुक्रवारी संध्याकाळी स्थानिकांनी एकत्र जमून पुलावरील अडथळे काढले आणि वाहतुकीला खुली करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मात्र या प्रकाराबाबत अनभिज्ञ होती.

वर्सोवा खाडीवरील जुन्या पूलाच्या शेजारी नवीन वर्सोवा पूल तयार करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा तर्फे सुरू करण्यात आले आहे. या पुलाची मुंबई-ते सुरत ही मार्गिका २७ मार्च रोजी खुली करण्यात आली होती. मात्र सुरत मुंबई मार्गिकेचे काम विविध प्रकारच्या अडचणीमुळे मार्गिकेचे काम रखडले होते. त्यामुळे दररोज ठाणे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले होते. काम पूर्ण होऊनही पुलाची मुंबईच्या दिशेने जाणारी मार्गिका खुली केली जात नसल्याने अडचणी अधिक वाढत होत्या. त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी भूमिपुत्र फाउंडेशनच्या या संघटनेने अचानक पुलावर एकत्र येऊन मार्गिका वाहतुकीला खुली केली. यानंतर दुसर्‍या मार्गिकेतून वाहनांची ये-जा सुरू झाली. नाताळच्या सणाच्या सुटट्या सुरू होत असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून आम्ही ही मार्गिका खुली केल्याचे भूमीपुत्र फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा >>>वसई : नोव्हेंबर महिन्यातील सर्वोत्कृष्ट तपास पुरस्कार प्रदान, ५ पोलीस अधिकार्‍यांचा आयुक्तांकडून गौरव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महामार्ग प्राधिकरण अनभिज्ञ

स्थानिकांनी अचानक पुढाकार घेऊन मार्गिका खुली केल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला असली तरी महामार्ग प्राधिकरण मात्र याबाबत अनभिज्ञ होते. मला यासंदर्भात माहिती नाही असे महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प निर्देशक सुहास चिटणीस यांनी सांगितले.