वसई: १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्या आरोपीला मिरा रोड पोलीस ठाण्याने अवघ्या ३६ तासात गजाआड केलं आहे. कुठलाही दुवा नसताना निळ्या रंगाच्या दुचाकीचा माग काढत ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपी हा फूड डिलिव्हरी करण्याचे काम करतो.
पीडित मुलगी १३ वर्षांची असून मिरा रोड येथे राहते. ती घरा बाहेर असताना एका तरुणाने तिची विचारपूस केली आणि तिला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आपल्या दुचाकीवर बसवले. त्यानंतर तिला मिरा रोडच्या अली हजरत मैदानाजवळ बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत नेले. तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीला घराजवळ सोडून तो फरार झाला. त्या मुलीने घरच्यांना प्रकार सांगितल्यानंतर मिरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलीला आऱोपीबद्दल काही माहिती देता येत नव्हती. याप्रकरणामुळे पालकवर्गात घबराट पसरली होती.
मिरा रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला. घटनास्थळाच्या आससापचे सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यात आरोपी दुचाकीवरून जाताना दिसला. मात्र त्या दुचाकीचा क्रमांक अस्पष्ट होता. ही दुचाकी निळ्या रंगाची होती. त्यानुसार पोलिसांनी आसपासच्या सीसीटीव्हीच्या आधारे माग काढण्यास सुरवात केली. एका इमारतीत ही दुचाकी जाताना दिसली. त्यानंतर पोलिसांनी पुढील तपास करून आरोपीला अटक केली. अजय गुप्ता (२३) असे या आरोपीचे नाव आहे. तो एका प्रसिध्द कंपनीत फूड डिलिव्हरी बॉयचे काम करतो. तो मूळचा उत्तरप्रदेशचा आहे. गुन्हा दाखल झाल्याच्या ३६ तासातच पोलिसांनी त्याला शोधून बेड्या ठोकल्या. घटनेच्या दिवशी तो जात असताना त्याला पीडित मुलगी एकटी दिसली. त्यामुळे तिच्या असहाय्यतेचा आणि अजाणतेपणाचा गैरफायदा घेत हे कृत्य केलं अशी माहिती पोलिसांनी दिली.
मिरा रोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघना बुरंडे तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सागवेकर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई करून आरोपीला बेड्या ठोकल्या.