वसई: नायगाव पूर्वेच्या कामण परिसरात खून करून फरार झालेल्या आरोपीला गुजरात राज्यातील द्वारका बंदर येथील जहाजातून अटक करण्यात आली आहे. तब्बल दोनशेहून अधिक जहाजे तपासणीनंतर नायगावच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले आहे. सुनील प्रजापती (३५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वसई पूर्वेकडील कामण येथील सेनरजी हायजील कंपनी येथे काम करणारे कामगार दिलीप सरोज व सुनील प्रजापती यांना कंपनीचे मालक प्रकाश धुंकर चामरिया यांनी ७ सप्टेंबरला दोघांच्या जेवणाच्या खर्चासाठी एकत्रित रक्कम आरोपी सुनिल प्रजापती याच्या बँक खात्यात दिले होते.परंतु सुनील याने दिलीप यांना जेवणासाठी दिली नाही. यावरून दोन्ही कामगारात वाद झाला होता. यात सुनील याने दिलीप याला मारहाण केली होती. यात दिलीप सरोज याचा मृत्यू झाला होता.याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात सुनील यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आरोपी फरार झाला.

दोनशेहून अधिक जहाजांची तपासणी….

फरार झालेल्या आरोपीच्या शोधासाठी प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांची दोन वेगवेगळी पथके तयार करून तपास सुरू केला होता. तपासा दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी हा ओका, व्दारका बंदर, गुजरात येथील जहाजात आपले अस्तित्व लपवुन राहत असल्याबाबत निष्पन्न झाले. ओका बंदरालगत असलेल्या सुमारे २०० पेक्षा जास्त जहाजांची तपासणी करुन आरोपी सुनील प्रजापती (३५) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केल्यावर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्यावर अटक करण्यात आली. याप्रकरणी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अभिजित मडके यांनी सांगितले आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अभिजीत मडके यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश केकान, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे, अनिल मोरे, फौजदार बाबाजी चव्हाण, पोलीस हवालदार शेखर पवार, सचिन ओलेकर, सचिन मोहीते, सचिन खंताळ, जयवंत खंडवी, अमर पवार, चेतन ठाकरे, अशोक पाटील, पांडुरंग महाले, बाळासाहेब भालेराव आणि अमोल बरडे आदींच्या पथकाने केली आहे.