भाईंदर :- एका आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी त्याच्या भावाकडे १०  लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हे शाखा-१ मधील  सहाय्यक पोलीस निरीक्षकावर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास टोकळे असे या लाचखोर पोलिसाचे नाव आहे. ठाण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हे गृहरक्षक दलात कार्यरत असून भाईंदर येथे राहतात. फिर्यादीच्या भावाला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा १ च्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास टोकळे (४१) यांच्याकडे होते. या प्रकरणात फिर्यादीच्या भावाला जामीन मिळवून देण्यासाठी तसेच कागदपत्रे आरोपीच्या बाजूने तयार करण्यासाठी टोकळे यांनी १० लाखांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सापळा लावून लाच मागितल्याचे संभाषण रेकॉर्ड करण्यात आले होते. मात्र लाचेच्या रक्कम स्विकारणाच्या वेळी टोकळे यांना संशय आल्याने ते आले नव्हते. मात्र लाच मागितल्याचा पुराव्याच्या आधारे बुधवारी रात्री उशीरा काशिमिरा पोलीस ठाण्यात टोकळे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या अधिनियम १९८८ ( संशोधन२०१८) च्या कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिंबधक विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन थोरात यांनी दिली.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news amy
First published on: 29-03-2024 at 03:29 IST