वसई: सहा दिवसांपूर्वी शहरात पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका सुक्या मासळीला बसला होता. वसई तालुक्यात २ हजार ५७३ इतक्या मच्छीमारांचे मत्स्यव्यवसाय विभागाने पंचनामे केले आहेत. त्यांचा अहवाल शासन स्तरावर सादर करण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपूर्वी वसईच्या किनार पट्टीच्या भागात अवकाळी पाऊस कोसळला होता.अवकाळी पावसामुळे पाचूबंदर, किल्लाबंदर, अर्नाळा, नायगाव कोळीवाडा येथे वलांडी वर मोकळ्या कोब्यावर  सुकविण्यासाठी ठेवलेली मासळी भिजून गेली होती. यात बोंबील, मांदेली व अन्य ओली मासळी सुकविण्यासाठी बांबूच्या परातीवर तसेच जेट्ट्यांवर ठेवलेली मासळी अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे पूर्णतः खराब झाली असल्याने मच्छिमार बांधवांचे लाखोंचे नुकसान झाले होते.

विशेषतः उन्हाळ्यात मासळी सुकवून त्याची आठवडी बाजारात विक्री केली जाते. अशा हंगामातच अवकाळी पाऊस झाल्याने सुकी मासळी विक्रेते मच्छिमार अडचणीत सापडले आहेत.

वसईच्या किनार पट्टीच्या भागात सुक्या मासळी विक्रेत्या महिलांचे अवकाळीने नुकसान केले आहे. त्यांच्या नुकसानाची पाहणी करून आढावा घेण्याचे काम मत्स्यव्यवसाय विभागाने सुरू केले होते. याशिवाय मच्छिमार संघटना, सहकारी संस्था यांच्या मार्फत नुकसान झाले असल्याचा आढावा घेण्यात आला होता. आतापर्यंत वसईत २ हजार ५७३ इतक्या मच्छीमारांचे मासळी भिजून नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

सुक्या मासळीचे नुकसान झाले आहेत त्यांचे पंचनामे केले आहेत. आतापर्यंत अडीच हजार पेक्षा जास्त नुकसानग्रस्त मच्छिमार आढळून आले आहेत. त्यांचा अहवाल तयार करून भरपाईसाठी शासन स्तरावर ठेवला जाईल.-विनोद लहारे, परवाना अधिकारी मत्स्यव्यवसाय विभाग वसई.

नुकसान भरपाईची मागणी

मच्छिमार आणि मत्स्यसंवर्धक यांना कृषी क्षेत्राप्रमाणे पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून देण्यासाठी मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे आता जे मच्छीमारांचे नुकसान झाले आहे त्यांना ही योग्य ती भरपाई मिळावी अशी मागणी मच्छिमार संघटनांनी केली आहे.

पुढील काळ कठीण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उन्हाळ्यात आठवडी बाजारात सुक्या मासळीला मोठी मागणी असते. अवकाळी ने मासळी भिजून गेल्याने सुक्या मासळीची आवक कमी झाली आहे. सुक्या मासळी विक्रीतून मिळणाऱ्या उत्त्पन्नावरच अनेक कुटुंबाचे संसार चालतात. आता या झालेल्या नुकसानीमुळे पुढील काळ कठीण असेल अशी प्रतिक्रिया सुक्या मासळी विक्रेत्या महिलांनी दिली आहे.