२०२२ या वर्षांत वसई विरार आणि मीरा भाईंदर शहरातून ६५० अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता झाली होती. यापैकी ५८२ मुलामुलींचा शोध लागला असून त्यातील अद्याप ६८ मुले-मुली बेपत्ता आहेत.वसई विरार शहरातून अल्पवीयन मुले-मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. २०२२ या वर्षांत वसई विरार आणि मीरा भाईंदर शहरातून ६५० अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता झाले होते. त्यामध्ये १९६ मुले आणि ४५४ मुलींचा समावेश होता. या बेपत्ता मुला-मुलींच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. बेपत्ता मुला-मुलींपैकी ५८२ जणांचा शोध लागला आहे. त्यामध्ये १८६ मुले आणि ३९६ मुलींचा समावेश आहे, परंतु अद्याप ६८ मुले-मुली बेपत्ता आहेत.

बहुतांश प्रकरणात या मुलांना फूस लावून पळवले जाते. वेळीच या मुलांचा शोध लागत नसल्याने त्यांच्याबरोबर गैरप्रकार होत असतात. प्रेमप्रकरणात अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविण्यात येते. त्यांच्या बाबतीत लैंगिक अत्याचाराचे प्रकार घडतात. संवेदनशील प्रकरणांचा लवकर तपास व्हावा यासाठी २०१३ पासून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी बेपत्ता झाल्यास अपहरणचा कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येतो.