प्रकरण उघडकीस आणल्यानंतर पोलिसांकडून समज

विरार : वसईतील एका व्यापाऱ्याने ऑनलाइन गुंतवणुकीत लाखो रुपये बुडाल्याने स्वत:च चोरीचा बनाव रचत पोलिसांनाच कामाला लावले. पण पोलिसांनी त्याचा हा डावच उधळून लावला आहे. या व्यापाऱ्याने वसई पोलीस ठाण्यात चोरीची गुन्हा नोंदविला होता. 

सोमवारी दुपारी वसई पोलीस ठाण्यात मुलीच्या लग्नासाठी जमा केलेले दहा लाख रुपये चोरटय़ांनी लुटून नेल्याची तक्रार एका व्यापाऱ्याने केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणी तपास सुरू केला असता या प्रकरणात जे उघड झाले हे पाहून पोलिसांनाच मोठा धक्का बसला. या व्यापाऱ्याने बिटकॉइनमध्ये हे पैसे गुंतविले होते. पण त्यात त्याला मोठा तोटा झाला. यामुळे आता घरी आपल्या पत्नीला काय सांगायचे यासाठी त्याने हा डाव रचला होता. त्यानंतर पोलिसांनी व्यापाऱ्याला समज देऊन सोडून दिले आहे.

सुभंत यशवंत लिंगायत असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. वसईच्या पापडी येथील साई सव्‍‌र्हिस सेंटरसमोर दहा लाख रोकड घेऊन जात होते. त्यावेळी त्याच्या हातातील रोकड घेऊन अज्ञात चोरटे फरार झाले, अशी तक्रार सुभंत लिंगायत यांनी वसई पोलिसांत दिली. मात्र अवघ्या तासाभरात पोलिसांनी त्याचा बनाव उघड केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभंत लिंगायत यांच्या मुलीचे ८ डिसेंबर रोजी लग्न आहे. यासाठी त्यांनी दहा लाख रुपये जमा केले होते. परंतु मुलीच्या लग्नाआधीच त्यांनी या पैशांची बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केली. पण त्यांना बिटकॉइनमध्ये मोठय़ा प्रमाणात तोटा झाला. पत्नीला काय सांगायचे असा प्रश्न त्यांना पडला. त्यानंतर त्यांनी दहा लाखांची रोकड चोरटय़ाने चोरून नेल्याचा बनाव रचल्याचे पोलिसांनी सांगितले.