वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सलग चौथ्या दिवशीही वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. वर्सोवा पुलापासून ते विरार फाट्या दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.वाहनांच्या रांगा ३० ते ३५ किलोमीटरपर्यंत जाऊन पोहचल्या आहेत. त्यामुळे तासनतास प्रवासी यात अडकून पडले आहेत.ठाणे घोडबंदर मार्गाची अवस्था बिकट झाल्याने घाट मार्गात चार दिवसांपासून दुरुस्तीचे काम सुरू आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली असून त्याचा सर्वात मोठा परिणाम मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झाला आहे. सलग चौथ्या दिवशी ही महामार्गावर ठाणे मुंबई मार्गा वर वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. बुधवारी सकाळपासूनच वर्सोवा पुलापासून ते विरार फाट्या दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. हीच वाहतूक कोंडी आता ढेकाळे – मनोर पर्यँत जाऊन पोहचली आहे. जवळपास ३० ते ३५ किलोमीटरपर्यंत या रांगा लागल्या आहेत.

या वाहतूक कोंडीचा मोठा फटका वाहनचालकांसह नोकरदार वर्ग, शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका, स्थानिक नागरिक यांना बसला आहे. अवघ्या ५ ते १० मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी कोंडीमुळे दोन ते दोन तास लागत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले आहे. वाहतूक नियोजन नाही त्याचा हा परिणाम दिसून येत आहे अशी प्रतिक्रिया एका प्रवाशांने दिली आहे. वाहतूक नियोजनाचे काम रात्रंदिवस सुरू आहे असा दावा वाहतूक पोलिसांनी केला आहे.

कोंडीमुळे पालकमंत्र्यांचा ताफा विरुद्ध दिशेने

बुधवारी पालघर जिल्हाधिकारी कार्यलयात जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठक पार पडणार आहे. या बैठकीला  जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत होणार आहे. मात्र महामार्गावर निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत पालकमंत्री गणेश नाईक सुद्धा अडकून होते.वाहतूक कोंडीमुळे पालकमंत्री गणेश नाईक यांचा ताफा विरुद्ध दिशेने काढावा लागला आहे. एकीकडे नागरिक कोंडीत अडकून पडत असताना दुसरीकडे मंत्र्यांना विरुद्ध दिशेने जाण्यासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी जनतेस वेठीस धरले जात आहे असा आरोप नागरिकांनी केला आहे.

अवजड वाहनबंदीचे नियम पायदळी

ठाणे घोडबंदर मार्गावर दुरुस्तीच्या कामामुळे जड अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र बंदी काळात ही अवजड वाहने विरार फाटा ते वर्सोवा पूल या मार्गावर येत आहेत. त्यामुळे कोंडीत आणखीनच भर पडू लागली आहे. अवजड वाहनांना बंदीचे आदेश लागू करणारा वाहतूक विभागाच नियोजनात निष्क्रिय ठरला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

ऑक्टोबर हिटच्या झळा

मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. ऑक्टोबर महिना सुरू झाला असून कडक्याचे ऊन पडत आहेत.  वाहतूक कोंडीत अडकून असलेल्या प्रवासी नागरिक, शाळकरी विद्यार्थी यांना या उन्हाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. उन्हामुळे प्रचंड गर्मी होत असून अंगाची अक्षरशः लाही लाही होत आहे असे प्रवाशांनी सांगितले आहे. सर्वच गाड्या मध्ये वातानुकूलितची सोय नसते त्यामुळे इतर वाहनचालक व प्रवासी यांना याचा त्रास होतो असे वाहनचालक युगेश पाटील यांनी सांगितले आहे.