Truk Accident on National Highway विरार : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील ससूनवघर भागातील शनया ढाब्याजवळ मंगळवारी सकाळी मालवाहतूक ट्रक व मिक्सर यांची धडक लागून अपघात घडला. या अपघातामुळे मालवाहतूक वाहन उलटले. त्यामुळे मुंबईच्या आणि ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. मागील दहा ते बारा तास उलटूनही ट्रक बाजूला न केल्याने प्रवाशांना तासनतास या वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत आहे.

वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. पावसाळा सुरू होताच या महामार्गावर विविध समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. महामार्गावर विविध ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेग फारच मंदावला आहे. त्यातच मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास मुंबई वाहीनीवर अवजड मालाची वाहतूक करणारा ट्रक व मिक्सर यांची धडक लागून ट्रक उलटला. यामुळे संपूर्ण अवजड साहित्य रस्त्यावर पडले. साहित्य अवजड असल्याने उचलण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे मुंबई ठाणे या दिशेने जाणाऱ्या वाहनांना अडथळे  येऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे ससूपाडा ते नायगाव दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जवळ दहा ते बारा तासाचा कालावधी उलटून गेल्यानंतर ही उलटलेला ट्रक बाजूला न केल्याने कोंडी अधिकच तीव्र झाली असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे.

उलटलेला ट्रक व त्यामध्ये अवजड साहित्य बाजूला करण्यासाठी क्रेन मागविल्या होत्या त्याने ही हे साहित्य बाजूला झाले नाही यासाठी आता मोठा हायड्रा मागवून ते बाजूला करण्यात येत असल्याचे वाहतूक पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी सांगितले आहे. तसेच वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचारी तैनात असल्याचे त्यांनी सांगितले.

ऐन गणेशोत्सवात कोंडीचे विघ्न

गणेशोत्सव सणाची मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे त्यामुळे विविध कामांसाठी खरेदीसाठी नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत तर काही आजूबाजूचे गाव पाड्यातील नागरिक यांच्या घरीही गणपतींचे आगमन होणार आहे मात्र सकाळपासूनच वाहतूक कोंडी असल्याने कामानिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला तर गणपतीच्या आगमनाच्या दरम्यान हे कोंडीचे विघ्न निर्माण झाले असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.

रोरो सेवेवर ही परिणाम

राष्ट्रीय महामार्गावर निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहन चालक वसई ते भाईंदर असा रो-रो ने प्रवास करीत आहेत. मात्र रोरो ची एकच फेरीबोट सुरू असल्याने तेथेही प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रोरो सेवेच्या मार्गावर ही वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे.