भाईंदर : भाईंदर पूर्व येथील रेल्वे स्थानकाबाहेरील अरुंद रस्त्यावर बेशिस्त रिक्षा चालक रस्ता अडवून उभे राहत असल्याने सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे अशा चालकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
भाईंदर पूर्वे रेल्वे स्थानकाबाहेरील रस्ता अत्यंत अरुंद असून, या ठिकाणी नागरिकांची आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. याच रस्त्यावरून बेस्ट आणि मिरा-भाईंदर महापालिकेची परिवहन सेवा देखील चालते. त्यामुळे या भागातील वाहतुकीत सतत अडथळे निर्माण होतात.या समस्येवर तोडगा म्हणून स्थानकाबाहेरील एका बाजूला रिक्षा उभ्या राहण्यासाठी ठराविक ठिकाणी थांबे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक सुरळीत होते. मात्र, अलीकडच्या काही दिवसांपासून अनेक रिक्षाचालक हे थांब्यावर उभे न राहताच रस्त्याच्या मधोमध आणि वळणावर रिक्षा उभी करून प्रवासी चढवतात. अशा बेशिस्त चालकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते.
वाहनचालकांना आणि प्रवाशांना रोजच या त्रासाला सामोरे जावे लागते. अनेक वेळा कोंडी सुटण्यासाठी १५ ते २० मिनिटे लागतात. त्यामुळे प्रवासी व प्रामाणिक रिक्षा चालक त्रस्त झाले आहेत. यावर उपाय म्हणून वाहतूक पोलिसांनी बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करून रस्ता मोकळा करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.तर याबाबत लवकरच पाहणी करणार असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
पोलिसांचे दुर्लक्ष?
भाईंदर रेल्वे स्थानकावर वाहतूक पोलिसांनी कर्मचारी नेमले असले, तरी हे कर्मचारी प्रामुख्याने नवघर आणि बी.पी. रोड मार्गांवर उभे असतात. मात्र, हे कर्मचारी वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष करून केवळ दंडात्मक कारवाईवर भर देत असल्याची टीका होत आहे. परिणामी, बेशिस्त रिक्षा चालकांचे मनोबल वाढले असून, त्यांच्यावर कोणतेही नियंत्रण राहत नसल्याचे रिक्षा संघटनांचे म्हणणे आहे.
नियमांकडेही दुर्लक्ष
मिरा भाईंदर शहरात वाहतूक नियमांनुसार रिक्षा चालकांनी गणवेश परिधान करणे, मोबाईलचा किंवा ध्वनी यंत्राचा वापर न करणे तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. या बाबत पोलीस आयुक्तालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. तरीही बरेच रिक्षाचालक हे नियम सर्रासपणे पायदळी तुडवत असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे.