वसई विरारचा परिसर म्हणजे हिरवागार निसर्ग, फळबागा, विस्तीर्ण समुद्रकिनारा, डोंगररांगा, बावखले, सुंदर तलाव असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. निसर्ग संपन्नतेने नटलेल्या या वसईला ‘हरित वसई’ अशी ओळख मिळाली. परंतु गेल्या काही वर्षांपासून विविध मार्गाने वसईचा हरित पट्टा ओरबाडण्याचे प्रयत्न सुरू आहे. बदलत्या काळाच्या ओघात गावांचे शहरात रूपांतर होऊ लागले आहे. रुपांतर होत असताना पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने कोणताच विचार होत नसल्याने आज वसईत विविध समस्या निर्माण होऊ लागल्या आहे. त्यामुळे वसईतील अनेक पारंपारिक व्यवसाय ही अडचणीत सापडू लागले आहेत. याशिवाय पर्यावरणाचीही मोठी हानी होऊ लागली आहे.
शहराचा विकास साधत असताना पर्यावरणाचाही विचार होणे आवश्यक आहे. यात विशेषतः पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र टिकविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असताना अशी क्षेत्र सुद्धा शहरीकरणाच्या रेट्यात सापडू लागली आहेत. परिणामी हरित पट्ट्यासोबत इथल्या जैवविविधतेला धोका निर्माण होऊ लागला आहे.
मागील काही वर्षात शहरात होत असलेली वाढती विकासकामे , नव्याने तयार होत असलेले प्रकल्प, बुजविण्यात येत असलेले जलस्त्रोत, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र टिकविण्यासाठी होत असलेले दुर्लक्ष, चटई निर्देशांक क्षेत्रात करण्यात आलेली वाढ, वाढते प्रदूषण, वाढते अतिक्रमण, बेसुमार वाळू उपसा, खाडी प्रदूषण, पाणी जाण्याचे नैसर्गिक बंद झालेले मार्ग, अशा विविध मार्गाने पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
मुंबई उपनगराला लागून वसई विरार शहर असून या शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढू लागले आहे. शहरात विविध ठिकाणी मोठं मोठे बांधकाम प्रकल्प उभे राहत आहेत. हळूहळू हे प्रकल्प वसई विरार शहराच्या हरित पट्ट्याकडे वळू लागले आहे. त्यामुळे येथील हरित पट्टा धोक्यात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
गावात पायाभूत सुविधांचा अभाव
महापालिका स्थापन होऊन १६ वर्षे उलटून गेली मात्र येथील प्राथमिक सोयीसुविधा व शहरनियोजनाचा अभाव अशा अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच आता नव्याने फोफावत असलेल्या टॉवर संस्कृतीची मोठी अडचण उभी राहण्याची भीती व्यक्त जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावात नागरिक राहत आहेत त्यांना प्रशासनाने योग्य त्या सुविधा पुरविल्या नाहीत. रस्ते, गटारे, पिण्याचे पाणी, पदपथ, परिवहन सेवा यासह इतर प्राथमिक सुविधांची वानवा आहे. असे असताना आता सर्रासपणे विकासकांना बांधकाम परवानग्या देऊन काँक्रिटची जंगले उभारली जात आहे. गावात जागोजागी उभे राहणाऱ्या टॉवरमुळे वाढणारी लोकसंख्या, वाहनांची संख्या, प्रदूषण असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर वसईतील नागरिकांनी पुन्हा एकदा एकजूट दाखवत या टॉवर संस्कृतीच्या विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. यासाठी नुकताच वसईच्या मुळगाव येथे निर्धार चौक सभा पार पडली. यात पाचशेहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. जोपर्यंत पायभूत सुविधा नाहीत तोपर्यंत टॉवर नाहीत असा पवित्रा घेत टॉवर संस्कृतीला विरोध दर्शविला आहे. या काँक्रिटच्या जंगलामुळे वसई पश्चिमेच्या भागातील हरित पट्टा नष्ट होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. वसईतील पर्यावरणप्रेमी पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी आजही त्यांचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. खरंतर आता सर्वांनीच एकत्र येऊन पर्यावरण संवर्धनसाठीची चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज निर्माण झाली आहे.
नियमातील बदलांचा धोकादायक परिणाम ?
शासनाने हरीत वसईत चटई क्षेत्र निर्देशांक ( एफएसआय) वाढविला आहे. ०.३३ टक्के इतका असलेला चटई क्षेत्र निर्देशांक तीन पटीने वाढविण्यात आला आहे. त्यामुळे या हरित पट्ट्यात अनिर्बंध विकास होणार आहे. हरित पट्टयात बांधकामे होतील, औद्योगित वसाहती उभ्या राहतील. मग हा हरित पट्टा केवळ भूतकाळ बनून राहणार आहे. दुसरीकडे सागरी निमयन क्षेत्राची मर्यादा ५०० वरून ५० फूटांवर आणली आहे. त्यामुळे किनारपट्टीवर ताराकिंत पर्यटन क्षेत्रे विकसित होतील. यात उध्दवस्त होईल तो सर्वसामान्य भूमीपूत्र त्यामुळे हा बदल खूप धोकादायक ठरणार आहे.
गावातील गाव पण उध्वस्त होण्याची भीती
मागील काही वर्षांपासून वसई विरारच्या किनार पट्टीवर रिसॉर्ट संस्कृती फोफावू लागली आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या बेसुमार वाढली आहे. या वाढत्या पर्यटकांच्या गर्दीने व हुल्लडबाजीमुळे वसईच्या भागातील शांतता भंग होऊन येथील निवांत पणा हरवत चालला आहे. वसईतील रिसॉर्ट संस्कृतीच्या विरोधात वसईतील नागरिक लढा देत आहेत. सागरी नियंत्रण क्षेत्राची मर्यादा ५०० वरून ५० मीटर वर आणल्याने रिसॉर्ट फोफावू लागले आहेत. यामुळे येथील पर्यावरणाला तर धोका निर्माण झाला आहेच. याशिवाय गावातील नैतिकता ढासळली आहे.
पर्यटन विकास महत्वाचा असला तरी त्यात नियोजनबद्धता असणे गरजेचे आहे. वसईच्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करता एखाद्या भागात क्षमतेपेक्षा अधिक पर्यटक आल्यास त्याचा परिणाम लगेच दिसून येतो. त्यामुळे येथील नागरिकांना मोकळा श्वास घेणे ही कठीण झाले आहे. अशा प्रकारच्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात नाहीत. जर यावर नियोजनात्मक उपाययोजना झाल्या नाहीत तर आगामी काळात अशी रिसॉर्ट संस्कृती गावातील गाव पण उध्वस्त करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.