वसई : वसई पश्चिमेच्या पापडी परिसरात अज्ञात व्यक्ती कडून गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहेत. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.निवडणुकीच्या तोंडावर गोळीबार करण्यात आला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

वसई पश्चिमेच्या भागात पापडी परिसर आहे. या भागातील जामा मस्जिद जवळच्या भागात सामाजिक कार्यकर्ते सलमान उर्फ बाबू गुलाम मिसाळ हे राहतात. ते रात्रीच्या सुमारास घरी असताना अचानकपणे त्यांच्या घरावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात मोठी खळबळ उडाली. याबाबत बाबू यांनी ११२ क्रमांकावर संपर्क करून पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर वसई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदर ठिकाणाचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.या गोळीबारात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसून घराच्या खिडकीची काच यात फुटली आहे. या घटनेमुळे पापडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोळीबार?

गेल्या अनेक वर्षांपासून मी राजकारणात सक्रीय आहे. यावर्षीची महापालिका निवडणूकही मी लढवणार आहे. त्यामुळे मला घाबरवण्यासाठी किंवा मी निवडणुकीतून मागे हटावं म्हणून हा झालेला असू शकतो. पोलिसांचा तपास सुरू आहे. पण, त्यातून ठोस अशी माहिती समोर आलेली नाही, अशी प्रतिक्रिया बाबू मिसाळ यांनी दिली आहे.