वसई: “उत्तन ते विरार” सागरी सेतू प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाची अंतिम मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीच्या सुटकेसह येथील प्रादेशिक विकासाला चालना मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई महानगर क्षेत्रात मागील काही वर्षापासून झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. यातून सुटका व्हावी यासाठी विविध प्रकारचे दळणवळण करण्याचे मार्ग विकसित केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणातर्फे वर्सोवा-विरार सागरी सेतू प्रकल्पात बदल करून “उत्तन ते विरार” सागरी सेतू प्रकल्प साकारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पात एकूण ५५.१२ किमीपैकी २४.३५ किमी लांबीचा प्रत्यक्ष सागरी सेतू, ९.३२ किमीचा उत्तन आंतरबदल मार्ग (कनेक्टर), २.५ किमीचा वसई आंतरबदल मार्ग, आणि १८.९५ किमीचा विरार आंतरबदल मार्ग यांचा समावेश आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास दक्षिण मुंबईहून थेट विरारमध्ये काही मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे.
सुरुवातीला या प्रकल्पाचा खर्च ८७ हजार कोटी रुपये इतका निश्चित करण्यात आला होता. मात्र हा खर्च अधिक असल्याने त्यांच्या आराखड्यात फेरबदल करून त्या खर्चात कपात करण्यात आली आहे.आता हा खर्च ५२हजार ६५२ कोटी पर्यँत आणण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी उत्तन-विरार सागरी पूल प्रकल्पाला पर्यावरण विभागाची अंतिम मान्यता मिळाली आहे.त्यामुळे प्रकल्प उभारणीचा पुढील मार्ग मोकळा झाला आहे.
सिग्नल फ्री प्रवास ….
यातील विरार कनेक्टर दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेशी थेट जोडला जाणार आहे, तर दुसऱ्या टोकाला तो वर्सोवा-भाईंदर-दहिसर कोस्टल रस्त्याशी जोडला जाईल. या सर्व प्रकल्पांच्या एकत्रिकरणानंतर मरीन ड्राइव्हपासून विरारपर्यंत अखंड, सिग्नल-फ्री कनेक्टिव्हिटी निर्माण होईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दोन ते अडीच तासांचा प्रवासासाठी लागणारा वेळ ४० ते ४५ मिनिटांवर येणार आहे.
मच्छीमाराना विश्वासात घेऊनच प्रकल्प उभारा
उत्तन ते विरार सागरी सेतू प्रकल्पास उत्तनच्या मच्छीमारांनी तीव्र विरोध दर्शवला होता. या मार्गामुळे मासेमारीचा व्यवसाय पूर्णतः ठप्प होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मच्छीमाराना बाधा ठरणार नाही. यासाठी त्यांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प उभारला जावा अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
- प्रकल्पाचा तपशील :
एकूण लांबी : ५५.१२ कि.मी.
मुख्य सागरी पुलाची लांबी : २४.३५ कि.मी.
कनेक्टर्स : ३०.७७ कि.मी.
- कनेक्टर्स ब्रेक-अप :
उत्तन कनेक्टर : ९.३२ कि.मी.
वसई कनेक्टर : २.५ कि.मी.
विरार कनेक्टर : १८.९५ कि.मी.
