वसई : गुरुवारी झालेल्या वाहतूक कोंडीत १६ महिन्याच्या चिमुकल्याचा वाहतूक कोंडीत अडकून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले असून याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक होत शनिवारी खानिवडे टोल नाका येथे तीव्र आंदोलन केले. वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. पावसाळा सुरू होताच या महामार्गावर विविध समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. 

महामार्गावर विविध ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेग फारच मंदावत आहे . त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे तर खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना ही समोर येऊ लागल्या आहेत. महामार्गावर वर्सोवा ते विरार फाटा दरम्यान सातत्याने निर्माण होणारी वाहतूक कोंडी आता जीवघेणी ठरू लागली आहे.

गुरुवारी झालेल्या वाहतूक कोंडीचा मोठा फटका रुग्णवाहिकेला बसला या वाहतूक कोंडीत अडकून रियान शेख या १६ महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता.या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले असून राजकीय पक्ष ही आक्रमक झाले आहेत.शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास मनसेने महामार्गावरील विरार खानिवडे टोल नाका येथे रास्ता रोको करीत या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. महामार्गावर विविध ठिकाणी खड्डे पडले आहेत. तर दुसरीकडे वाहतूक नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे आज सर्वसामान्य नागरिकांचे बळी जात असल्याचा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

या १६ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू आला त्याला जबाबदार कोण असा सवाल मनसेचे शहर प्रमुख प्रवीण भोईर यांनी केला आहे. ज्यांच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना घडल्या आहेत असे ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी मनसेने केली आहे. आधी रस्त्यावरील खड्डे दुरूस्त करा मगच टोल नाका सुरू करा अशा घोषणा देत काही काळ आंदोलकांनी टोल नाका बंद पाडला होता. येत्या सात दिवसांत खड्डे बुजविले जातील असा दावा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.