वसई: प्रियकराने अश्लील छायाचित्रांच्या आधारे केलेले ब्लॅकमेल, वडिलांना महाविद्यालयात केलेली मारहाण यामुळे नैराश्यात गेलेल्या १९ वर्षीय तरूणीने राहत्या इमारतीच्या ४ थ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१९ वर्षीय तरुणी विरार येथील एका महाविद्यालयात शिकत होती. या महाविद्यालयात येणार्या एका तरूणाशी तिचे प्रेमसंबंध होते. त्या मुलाने तिची अश्लील छायाचित्रे काढली होती. त्यामुळे ती व्यथित झाली होती. या प्रकाराबाबत तिने आपल्या वडिलांना सांगितल्यानंतर सोमवारी महाविद्यालयात जाब विचारायला गेलेल्या तिच्या वडिलांना बाहेरून आलेल्या काही मुलांनी मारहाण केली.
या सर्व प्रकारानंतर नैराशेत गेलेल्या तरुणीने सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास राहत्या इमारतीच्या ४ थ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तिला उपचारासाठी वसईतील खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर हा गुन्हा विरार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती विरार पोलिसांनी आहे.
यापूर्वी सुद्धा नालासोपारा येथील दोन तरुणांनी विरार मध्ये एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या अठराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. शहरात सातत्याने आत्महत्येच्या घटना समोर येत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.