वसई:- नालासोपाऱ्यात सोमवारी रोहित्राचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत दोन जण होरपळले. त्यातील एका सहा वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेनंतर शहरातील रोहित्रांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा घटना रोखण्यासाठी अशा धोकादायक रोहित्रांची तपासणी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
महावितरणने वसई विरार शहरात नागरिकांना वीज पुरवठा करण्यासाठी विविध ठिकाणी वीज रोहित्र बसविण्यात आले आहेत. शहरातील महावितरणच्या रोहित्रांची संख्या ५ हजार ८०० इतकी असून त्यातून ग्राहकांना वीज वितरित करण्यात येते. मात्र महावितरणकडून या रोहित्रांच्या सुरक्षिततेची पाहणी वेळोवेळी केली जात नसल्याने शहरातील रोहित्र आता धोकादायक ठरत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे रोहित्राला आगी लागणे, रोहित्र कोसळणे, रोहित्रामुळे विजेचा धक्का लागणे अशा दुर्घटना समोर येऊ लागल्या आहेत. सोमवारी रात्री नालासोपारा पश्चिमेच्या डांगेवाडी परिसरात अचानकपणे रोहित्राचा भीषण स्फोट होऊन आग लागली होती. या आगीत दोन जण होरपळले असून नसरीन परवीन शेख (६) या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत महावितरणकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने अशी घटना घडली असल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे. या घटनेनंतर शहरातील अन्य भागात असलेल्या रोहित्रांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रोहित्रांचा धोका कायम
शहरात अजूनही विविध ठिकाणी नागरिक वस्ती व रहदारी असलेल्या अशा प्रकारचे धोकादायक रोहित्र आहेत. अंबाडी रोड, नालासोपारा यासह अनेक ठिकाणी रोहित्रांना सुरक्षा जाळ्या नसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर काही रोहित्रांवर क्षमतेपेक्षा अधिक भार आहे. त्यामुळे काही वेळा शॉर्ट सर्किट होऊन रोहित्रांना आगी लागण्याच्या घटना घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. तसेच जागोजागी असलेल्या उघड्या रोहित्रांमुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणे सुद्धा धोकादायक झाले आहे. महाविरणाचा बेजबाबदार कारभारामुळे निष्पाप नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर उघड्यावर धोकादायक अवस्थेत असलेल्या सर्व रोहित्रांना तातडीने सेफ्टी बॉक्स बसवावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शहरात धोकादायक स्थितीत असलेल्या रोहित्रांची तपासणी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जॉय फरगोस यांनी केली आहे.
शहरातील सर्वच ठिकाणाच्या रोहित्रांची पाहणी करण्याच्या सूचना संबंधित ठिकाणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या जातील व आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्यात येतील. – चंद्रमणी मिश्रा, मुख्य अभियंता कल्याण परिमंडळ महावितरण
रोहित्र दुर्घटना
३० मे २०२५ रोजी विरार पश्चिमेच्या अर्नाळा धसपाडा येथे रोहित्राच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना महावितरणच्या चार कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का लागला यात जयेश घरत (२८) याचा मृत्यू झाला तर अन्य तीन जण जखमी झाले होते.
१९ जून २०२५ नायगाव पश्चिमेच्या विजय पार्क परीसरात वादळीवाऱ्यामुळे महावितरणचे रोहित्र कोसळले होते. सुदैवाने त्यावेळी कोणीही जवळ नसल्याने मोठा अनर्थ टळला.
२२ सप्टेंबर २०२५ नालासोपारा डांगे वाडी रोहित्राचा स्फोट होऊन आग यात सहा वर्षीय नसरीन परवीन हिचा मृत्यू तर जावेद अन्सारी हा तरुण जखमी.
