वसई: शौर्य आणि बलिदानाचा साक्षीदार असलेला वसईचा ऐतिहासिक किल्ला यंदाच्या दीपोत्सवात पुन्हा एकदा हजारो दिव्यांनी उजळून निघणार आहे. मराठा सैन्याच्या पराक्रमाला मानवंदना देण्यासाठी आमची वसई या सामाजिक संस्थेने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भव्य दीपोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. रविवार, १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता नरवीर चिमाजी आप्पा स्मारक येथे हा दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
पोर्तुगीजांच्या अमानुष अत्याचारातून वसईकरांना मुक्त करण्यासाठी झालेल्या लढ्यात २१ हजारांहून अधिक मराठा शूर वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. त्या पराक्रमी सैन्याला मानवंदना देण्यासाठी आणि या शौर्याचा साक्षीदार असलेला वसईचा किल्ला प्रकाशमान करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला. प्रत्येक गावाच्या ग्रामस्थांनी कर्तव्य भावनेने गावातर्फे किमान ५०१ पणत्या लावून किल्ला उजळवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या दीपोत्सवात पणत्या प्रज्वलित करण्यासोबतच, रंगबेरंगी रांगोळ्या आणि मशाल मिरवणूक काढण्यात येणार आहे. नरवीर चिमाजी आप्पा स्मारक हे आकर्षक आकाशकंदिलांनी उजळवण्यात येणार आहे.
तर प्रवेशद्वार, तटबंदी, सागरी दरवाजा, सतीचा पार, ध्वजस्तंभ, हनुमान मंदिर आणि नागेश महातीर्थ या किल्ल्यातील महत्त्वाच्या स्थळांवरही पणत्या व तोरण लावून रांगोळी काढण्यात येणार आहे.या प्रसंगी सर्व वयोगटातील महिला व पुरुषांसाठी रांगोळी स्पर्धा आणि कंदील स्पर्धा ही आयोजित करण्यात आली आहे.