वसई: नालासोपारा येथील मदर वेलंकनी शाळेत बुधवारी दुपारी मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी शाळेच्या संचालिका आशा डिसोजा यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. शाळेती मुलांना दाखला दिला जात नसल्याच्या वादातून हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येत आहे.
नालासोपारा पूर्वेच्या तुळींज येथे मदर वेलंकनी एज्युकेशन ट्रस्टची शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलांना शाळा सोडल्याचा दाखला दिला जात नसल्याचा आरोप काही पालकांनी केला होता. त्याचा जाब विचारण्यासाठी बुधवारी दुपारच्या सुमारास मनसे कार्यकर्ते शाळेच्या आवारात शिरले. त्यावेळी कर्मचार्यांनी अन्य बाहेरील लोकांना काठीने हाकलून द्या असे सांगितले. त्यामुळे मनसे कार्यकर्ते चिडले. ही बाब समजताच आणखी कार्यकर्ते जमा झाले. दाखले न देता विद्यार्थ्यांची अडवणूक केली जाते असा आरोप पालकांनी केला. त्यावरून मनसे कार्यकर्ते आणि शाळेच्या व्यवस्थापनात जोरदार वाद झाला. यावेळी मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी संचालिका आशा डिसोजा यांना मारहाण केली. मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. यामुळे तणाव निर्माण झाला होता. तुळींज पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.
१६ तारखेपासून शाळा सुरू झाली आहे मुले आल्यावर प्रमाणपत्र आणि निकालाची प्रत देऊ असं यापूर्वीच सांगितलं होतं. मात्र काल एक विद्यार्थी दाखला मागण्यासाठी आला होता. त्याला अर्ज घेऊन यायला सांगितलं तर त्याचे पालक मनसे कार्यकर्त्याना घेऊन आले, असे संचालिका आशा डिसोजा यांनी सांगितले. मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आणि मला मारहाण केली असाही आरोप त्यांनी केला. मनसेने मात्र शाळेवर उर्मट वागणूकीचा आरोप केला आहे. शाळा प्रशासन विद्यार्थ्यांची अडवणूक करत होते. त्याची विचारणा करण्यासाठी आम्ही गेलो होतो. मात्र शाळेचे कर्मचारी अंगावर आले. आमच्यावर चप्पल उगारून धक्काबुक्की केली. त्याला प्रतिक्रिया म्हणून आमच्या महिला कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली असे मनसे शहर संघटक रवींद्र पाटेकर यांनी सांगितले.
आशा डिसूजा या मदर वेलंकनी ट्रस्टच्या अध्यक्षा आहेत. नुकत्याच पार पडलेल्या राज्य स्तरीय शिक्षक अधिवेशनात त्यांना उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार मिळाला होता. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल संस्थेला विविध पुरस्करांनी गौरविण्यात आले आहे.
सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. आम्ही घटनास्थळावर बंदोबस्त ठेवला आहे. यासंदर्भात तक्रार आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बनकर यांनी सांगितले.