वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वर्सोवा पूल ते विरार फाटा या दरम्यान विविध ठिकाणी छेद रस्ते तयार झाले आहेत. या छेद रस्त्याच्या मधूनच काही वाहनचालक वाहने काढत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. मागील काही वर्षांपासून या महामार्गावर वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे.या महामार्गावर दिवसेंदिवस विविध प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागल्याने याचा त्रास वाहनचालकांबरोबरच महामार्गालगत राहणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. या महामार्गाच्या भागात प्राधिकरणाने ठीक ठिकाणी दुभाजक आहेत. मात्र काही ठिकाणी दुभाजक तोडून फोडून छेद रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्या छेद रस्त्याच्या मधूनच आजूबाजूच्या भागातील माती भराव, मिक्सर व इतर अवजड वाहने, मालवाहतूक वाहने, दुचाकी स्वार येथून थेट वळण घेत असल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताच्या घटना समोर येत आहेत.
दुभाजकाच्या मधून व उड्डाणपुला खालून वळसा घेण्यासाठी रस्ते उपलब्ध आहेत. मात्र तरी सुद्धा वाहनचालक अशा प्रकारे वाहने मध्येच आणून वाहतुकीला अडथळे निर्माण करीत असल्याची तक्रार वाहनचालकांनी केली आहे. वाहतूक पोलीस ही त्यावर कारवाई करीत नाही प्राधिकरण ही बेकायदेशीर तयार झालेले छेद रस्ते बंद करीत नाही त्यामुळे अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे.
वर्सोवा पुलापासून ते ससूनवघर, मालजीपाडा, लोढा धाम, वास माऱ्या पूल, वसई फाटा, नालासोपारा यासह विरार फाट्या दरम्यान असे छेद रस्ते असल्याचे चित्र दिसून आहे. अनेक वाहनचालक लवकर पोहचण्यासाठी छेद रस्त्याच्या मधून वाहने काढून ती विरुद्ध दिशेने चालवितात.यामुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकांना देखील अनेक अडचणी निर्माण होत असतात. अशा कारणांमुळे वाहनांची धडक होऊ अपघात होण्याची शक्यता आहे. या अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी छेद रस्ते बंद होणे गरजेचे आहे. हे धोकादायक असलेले छेद रस्ते तातडीने बंदिस्त करावे अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
सोयीसाठी बेकायदेशीर छेद रस्ते
मागील काही वर्षात राष्ट्रीय महामार्गालगत माती भराव कामे, उपहार गृहांची वाढती संख्या, आरएमसी कारखाने, व अन्य कारखाने उभे राहिले आहेत. त्यांच्या सोयीच्या दृष्टीने अशा प्रकारे छेद रस्ते तयार करवून घेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यांच्या सोयीच्या दृष्टीने ते सोयीस्कर असले तर इतर प्रवासी प्रवास करतात त्यांच्या जीवावर असे छेद रस्ते बेतू शकतात यासाठी त्यावर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.
दुभाजक तयार करण्याचे काम सुरू
राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटी करण्याचे काम सुरू असून विविध ठिकाणी दुभाजक ही तयार केले जात आहेत. काही ठिकाणी मेटॅलिक स्वरूपाचे तर काही ठिकाणी काँक्रीटचे दुभाजक उभारण्यात येत आहेत. असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापक सुहास चिटणीस यांनी सांगितले आहे. तसेच जे बेकायदेशीर दुभाजक व छेद रस्ते आहेत ते सुद्धा बंदिस्त केले जातील असेही त्यांनी सांगितले आहे.