मध्य रेल्वेवर वसई-दिवा लोकलच्या अपुऱ्या फेऱ्या आहेत. यातच आज (मंगळवार) सकाळी सातची वसई-दिवा मेमो लोकल कामण रेल्वे स्थानकात एक ते दीड तास थांबूनच राहिल्याने, संतप्त प्रवाशांनी रेल्वे रुळावर उतरून ठिय्या आंदोलन केले.

वसई विरार यासह विविध भागातील बहुतांश नागरिक हे मध्य रेल्वेवर धावणाऱ्या वसई- दिवा – पनवेल या मार्गावरून प्रवास करतात. तर दुसरीकडे जूचंद्र, कामण, खारबाव, भिवंडी या स्थानकातून अनेक ग्रामीण भागातील नागरिक या गाडीने आपला छोटामोठा व्यवसाय करण्यासाठी शहरी भागाकडे येत असतात. याशिवाय, शाळकरी विद्यार्थी देखील या लोकलने प्रवास करतात. परंतु या मार्गावरील वसई-दिवा लोकलच्या फेऱ्या मोजक्याच आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांना प्रवासात अडचणी निर्माण होतात. कधी कधी ठरलेल्या वेळेत ही गाडी येत नाही, तर कधी अचानक रद्द होते. तर काही वेळा गाडी मध्येच थांबून राहते अशा वेळी प्रवाशांचा खोळंबा होतो.

आज सकाळी सात वाजता मध्य रेल्वेवरील कामण स्थानकात मेमो लोकल जवळपास एक तासाहून अधिक काळ थांबली होती. यामुळे सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांचा खोळंबा झाला होता. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी थेट रुळावर उतरून आंदोलन सुरू केले होते. यात शेकडो प्रवासी सहभागी झाले होते. काही काळ हे आंदोलन सुरू होते, अखेर रेल्वे पोलिस व अधिकारी यांच्या मध्यस्तीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

तांत्रिक कारणामुळे काही काळ मेमो लोकल थांबली होती. त्यानंतर पुन्हा या मार्गावरील रेल्वे सेवा सुरळीतपणे सुरू झाल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी दिली आहे.

मेमो लोकलच्या फेऱ्या वाढवा –

वसई -दिवा – पनवेल या मार्गावर लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात अशी मागणी प्रवाशांनी रेल्वेकडे अनेकदा केली आहे. परंतु त्यावर कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना झाल्या नाहीत. नुकतेच झालेल्या आंदोलनादरम्यान पुन्हा एकदा प्रवाशांनी या मार्गावरील प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेता, वसई दिवा मार्गावरील फेऱ्या वाढविण्यात याव्यात अशी मागणी केली आहे.