विरार : नाशिक येथे होणाऱ्या २७ व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी सायमन मार्टिन यांची निवड झाली आहे. नुकताच अहिल्यानगर येथील बिशिप हाऊस येथे संपन्न झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या सभेमध्ये त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. हे संमेलन पुढील वर्षी नाशिक येथे ९, १० आणि ११ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.

वसईकर असणारे सायमन मार्टिन हे सुप्रसिद्ध कवी आणि लेखक असून त्यांची १६ पुस्तके प्रकाशित आहेत. मार्टिन हे सामाजिक जाण असलेले कवी म्हणून ओळखले जातात. लेखन आणि जगण्याची भूमिका एकच असते असे मानून ते गेल्या अनेक वर्षांपासून लेखन करत आहेत. लेखनासोबतच वसईत सामाजिक वर्तुळातही ते मागील चार दशकांहुन अधिक काळ सक्रिय आहेत. तसेच ते वसईतून प्रसिद्ध होणाऱ्या सुवर्ता मासिकाचे गेल्या २५ वर्षांपासून सहसंपादक म्हणून कार्यरत होते. साधना प्रकाशनासह इतरही प्रकाशन संस्थांकडून त्यांचे साहित्य प्रकाशित करण्यात आले आहे.

सायमन मार्टिन यांना राज्य शासनासह इतरही अनेक मान्यवर संस्थांचे पुरस्कार मिळाले असून त्यांच्या कवितांचा हिंदी, इंग्रजी आणि जर्मन भाषेत अनुवाद झालेला आहे. तसेच शालेय अभ्यासक्रमाबरोबरच स्वामी रामानंद तीर्थ आणि मराठवाडा विद्यापीठात त्यांच्या ‘तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यावर’ या कवितासंग्रहाचा अभ्यासक्रमात समावेश झालेला आहे. मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनच्या अध्यक्षपदी मार्टिन यांची निवड करण्यात आल्या बद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

मराठी ख्रिस्ती साहित्याने मराठी भाषेला समृद्ध करण्यात मोठे योगदान दिले आहे. फादर स्टीफन यांच्यापासून अनेकांनी मातृभाषेसाठी आपले योगदान दिले आहे. या संमेलनाच्या निमित्ताने मराठी ख्रिस्ती भाषिक समाजाकडून आपल्या मराठी भाषेचा झेंडा उंच फडकवला जात आहे आणि ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. – सायमन मार्टिन, ज्येष्ठ कवी