वसई : नालासोपारा येथे भर रस्त्यात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणार्या दोघांना गुन्हे शाखा ३ च्या पथकाने अटक केली आहे. विरेंद्र दुबे आणि विकास चौबे अशी या दोन आरोपींची नावे आहेत. या घटनेची चित्रफित व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
नालासोपारा पूर्वेच्या डी मार्ट जवळ असलेल्या रस्त्यात बुधवार ९ जुलै रोजी ही घटना घडली होती. येथील एक इस्टेट एजंट विरेंद्र दुबे याने आपला वाढदिवस साजरा केला होता. त्यासाठी भर रस्त्यात बेकायदेशीरपणे गर्दी जमविण्यात आली होती. आरोपींनी तलावारीने केक कापला होता. या घटनेची चित्रफित समाजमाध्यमावर व्हायरल करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हे शाखा- ३ च्या पथकाने आचोळे पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार विरेंद्र दुबे (४३) त्याचा साथीदार विकास चौबे (३९) या दोघांविरोधात आचोळे पोलीस ठाण्यात बेकायदेशीरपणे हत्यार बाळगणे, बेकायदेशीरपणे गर्दी जमवून सार्वजनिक शांततेचा भंग करणे आदींसाठी भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९ (१), १८९ (२), १८९ (४) १९० सह भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ सह मुंबई पोलीस ॲक्ट १९५१ च्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या दोन्ही आरोपींना गुन्हे शाखा- ३ च्या पथकाने अटक केली. आरोपींवर यापूर्वी विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा ३ च्या पथकाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, मध्यवर्ती गुन्हे शाखेचे प्रमुख अविराज कुराडे तसेच मुकेश तटकरे, रमेश आलदर, सागर बारवकर, प्रशांत पाटील, अमोल कोरे, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव , राकेश पवार, आतीश पवार, संदीप शेरमाळे आदींच्या पथकाने या आरोपींना अटक केली.