विरार : वसई पूर्वेच्या एव्हरशाईन सिटी येथे मंगळवारी रात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या अकरा जणांच्या टोळीचा कट उधळून टाकण्यात पोलिसांना यश आले आहे. यावेळी आरोपींकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. वसईच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा २ तसेच वालीव, माणिकपूर आणि आचोळे पोलीस ठाण्याच्या पथकांकडून कडून ही कारवाई करण्यात आली.

मंगळवारी रात्री वसई पूर्वेच्या एव्हरशाईन सिटी येथील राम रहीम नगर परिसरातील एक बंगल्यात सशस्त्र दरोडा टाकण्याच्या हेतूने काही जण येणार असल्याची माहिती वसईच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा २ ला प्राप्त झाली होती. यानुसार पोलिसांच्या पथकाने या परिसरात सापळा रचला होता. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत ११ जणांना अटक करण्यात आली असून आरोपींकडून यावेळी १ देशी बनावटीचे पिस्तुल आणि ४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून दरोडा टाकण्यासाठी आणलेले इतर साहित्य असा १ लाख ७७ हजार किंमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

कुमार साबळे (२९), ईब्राउद्दिन चौधरी (२४), कार्तिक कुमार सिंग (२४), गुरुप्रीत सिंग लबाना (३०), कैलास चिखले (५१) विष्णू खरात (२१) सचिन भालेराव (२६), विक्रम हरिजन (२२), रमजान कुरेशी (२४),गणेश भासले (३०) गणेश जाधव (१९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून यातील आठ आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात पालघर, मुंबई आणि ठाणे येथील विविध पोलीस ठाण्यात १३ गुन्ह्यांची नोंद आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

ही कारवाई वसईच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा २ चे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहायक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक संतोष घाडगे, अजित गीते तसेच वालीव, माणिकपूर आणि आचोळे पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या पथकाकडून करण्यात आली.