वसई: वसईच्या वाघोली गावातील शिल्पकार सचिन चौधरी यांच्या कलाकृतींचे सातवे एकल प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी भरवण्यात आले आहे. गेली ३६ वर्षे शिल्पकार चौधरी निसर्गातील चैतन्यशक्तीचा शोध घेत आपल्या शिल्पकलेच्या माध्यमातून तो लोकांसमोर मांडत आहे.
सचिन चौधरी १९९० पासून आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवत आहेत. यापूर्वी त्यांचे एकल शिल्पप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत पाच वेळा आणि नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत एक वेळा भरविण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, वसई, मुंबई, दिल्ली व कोलकाता या राज्यांमध्ये त्यांनी सुमारे १५ सामूहिक प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांच्या अनोख्या शिल्पकलेसाठी २०१९ साली त्यांना ललित कला अकादमी या राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.
शिल्प घडवित असताना एखादा भौमितिक आकार, आकार घेऊ लागतो आणि त्याच्या अंतरंगात डोकावताना मला असे जाणवते – मनुष्यजीवन हे एक अनंत गूढ आहे. त्यात एक आच्छादित, परंतु दिव्य स्तर दडलेला आहे. त्यापर्यंत पोहोचण्याचा, त्याला उलगडण्याचा प्रयत्न मी केला आहे. या सातव्या प्रदर्शनाद्वारे, त्या अंतर्मुख प्रवासातील काही क्षण साकार करण्याचा माझा प्रयत्न असल्याचे शिल्पकार सचिन चौधरी यांनी सांगितले.
यंदा ४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबरच्या दरम्यान मुंबईतील प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीत शिल्पकार सचिन चौधरी यांनी सातवे एकल प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात प्रेक्षकांना तीसहून अधिक कास्ट शिल्प, आयरन शिल्प आणि संगमरवरी शिल्प पाहता येणार आहेत.
