वसई : बहीण-भावाच्या अतूट बंधाला अधिकच दृढ बनवणारा सण म्हणजे रक्षाबंधन. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध प्रकरच्या राख्या वसईच्या बाजारात दाखल झाल्या आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मीनाकारी, चंदनाच्या, नक्षीकाम असलेल्या तसेच लाबुबू बाहुली आणि लुंबा राख्यांना बहिणींकडून पसंती मिळत आहे.
शनिवारी ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण साजरा साजरे केले जाणार असून यनिमित्त रंगीबेरंगी आणि आकर्षक राख्यांना बाजार फुलले आहेत. बहीण-भाऊ यादिवशी एकत्र येत हा सण साजरा करतात तर पारगावी राहणाऱ्या भावांना बहिणी पोस्टाद्वारे राख्या पाठवतात. यामुळे आठवड्याभर राखी खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. यंदा पारंपरिक राख्यांसोबतच नव्या आकर्षक राख्या बाजारात दाखल झाल्या आहेत.
मीनाकरी राख्या, चंदनाच्या नक्षीदार राख्यांना मागणी
दरवर्षी बाजारात विशिष्ट प्रकारच्या राख्यांचा ट्रेण्ड असतो. त्याचप्रमाणे यावर्षी बाजारात मीनाकारी म्हणजे धातूच्या पृष्ठभागावर काचेचा मुलामा चढवून किंवा जडावकाम केलेल्या राख्या, चंदनाच्या मण्यांवर बारीक नक्षीकाम असणाऱ्या अशा नाजूक आणि नक्षीदार राख्यांना बाजारात मागणी असल्याचे दिसून येत आहे. तर मोठाले डोळे, अजब हास्य आणि डोक्यावर दोन शेंड्या असलेल्या लबुबू बाहुलीचा ट्रेंडही आता राख्यांमध्ये पाहायला मिळतो आहे. त्याचप्रमाणे कडा, ब्रेसलेट अशा विविध प्रकारात आणि डिझाईनमध्ये उपलब्ध असलेली आणि भाऊ नव्हे तर बहिनीला बांधण्यात येणारी लुंबा राखी देखील यंदा मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात असल्याचे दिसून येत आहे.
याव्यतिरिक्त फॅन्सी जरी, रंगीबेरंगी मणी, गोंड्याच्या राख्या, काचेच्या सजावटीच्या राख्या, हिरेजडित राख्या लोकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. तर भाई, दादा, ब्रो अशी हटके नावे लिहिलेल्या, तर दुसरीकडे राम, कृष्ण अशा प्रतिमा असलेल्या तसेच मोरपंख, बासरी, त्रिशूळ असलेल्या राख्यांनाही बहिणींची विशेष पसंती मिळत आहे. त्यामुळे यंदा बहिणींना आपल्या भावासाठी विविध किंमतीतल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेंडी राख्या खरेदी करता येत आहेत.
लहान मुलांसाठी खास कार्टून्सच्या राख्या
लहान मुलांसाठीही छोटा भीम, डोरेमॉन, टॉम अँड जेरी, मोटू पतलू अशा कार्टूनमधील पात्रांवर आधारित राख्या. तसेच टेडीबिअर, लायटिंग असणाऱ्या राख्या, फीजेट स्पिनरसारख्या गोल गोल फिरणाऱ्या राख्या बाजारात दिसून येत आहेत.
इव्हील आय आणि रुद्राक्ष राख्यांचा ट्रेंड कायम
यंदा जरी वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या बाजारात उपलब्ध झाल्या असल्या तरी बहिणींकडून इव्हील आय आणि रुद्राक्षच्या राख्यांना असणारी मागणी कायम आहे. या राख्यांमध्येही लहान, नाजूक अशा साध्या राख्यांना मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे.
राखीच्या किंमतीत वाढ
यावर्षात वाढत्या महागाईमुळे राखीच्या किंमतीत २० – २५ रुपायांनी वाढ झाली आहे. बाजारात अगदी २ रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंतच्या राख्या उपलब्ध असून २ रुपयाला मिळणाऱ्या गोंड्याच्या राखीपासून ५०० रुपयांना विकली जाणारी हिरेजडित, खास नक्षीकाम केलेली राखी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा बहिणींना आपल्या भावासाठी विविध किंमतीतल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेंडी राख्या खरेदी करता येत आहेत.