वसई: मागील तीन ते चार दिवसांपासून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर वाहतूक कोंडीची समस्या उभी राहू लागली आहे. या निर्माण होणाऱ्या कोंडी मुळे मालवाहतूकदार व अन्य प्रवासी यांचे हाल होऊ लागले आहेत.
वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. पावसाळा सुरू होताच या महामार्गावर विविध समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. महामार्गावर विविध ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेग ही फारच मंदावला आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.वर्सोवा पुलापासून लागणाऱ्या वाहनांच्या रांगा या ससूनवघर, मालजीपाडा, तर कधी नायगाव बापाणे पर्यंत येऊ लागल्या आहेत.
त्यातच पाऊस सुरू होताच महामार्गावर काही ठिकाणच्या भागात पाणी साचते त्याचाही परिणाम वाहतुकीवर होत आहे. सतत निर्माण होणाऱ्या कोंडीत दोन ते तीन तास अडकून राहावे लागत असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे. विशेषतः रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेच्या वाहनांनाही फटका बसतो. तसेच अगदी जवळचे अंतर पार करण्यासाठी ही एक ते दीड तास इतका कालावधी लागू लागला आहे. वाहतुकीचे योग्य ते नियोजन नसल्याने सातत्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली आहे. महामार्ग प्राधिकरणाकडून खड्डे दुरुस्ती यासह अन्य कामेही व्यवस्थित होत नाहीत त्याचा सगळ्यात मोठा परिणाम वाहतुकीवर होऊन कोंडी समस्या निर्माण होत आहे नागरिकांनी सांगितले आहे.
वाहतूक पोलीस ही हतबल
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या अतिशय जटिल बनली आहे. या नियंत्रणाचे काम वाहतूक पोलिसांकडून केले जात आहे. मात्र वाहनांची वाढती संख्या व विरुद्ध दिशेने होणारा प्रवास यामुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पडत आहे. वाहतूक कोंडी सोडविताना आता वाहतूक पोलीस ही हतबल होऊ लागले आहेत.
प्रवाशांची दुहेरी कोंडी
रेल्वेतील वाढत्या गर्दीमुळे काही प्रवासी हे महामार्गावरून प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून कामाच्या इच्छित स्थळी सुरक्षित व आरामदायी प्रवास करता येईल. मात्र आता महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने अशा प्रवासी वर्गाची दुहेरी कोंडी होऊ लागली आहे.