वसई : सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू आहे. अशातच दिवाळीनिमित्त चिमुकल्यांनी साकारलेले गडकिल्ल्यांचे देखावे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.  पारंपरिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने हे किल्ले साकारण्यात आले असल्यामुळे दुर्गप्रेमींकडूनही या किल्ल्यांची दखल घेतली जात आहे. दिवाळी म्हटलं की किल्ले हे समीकरण फार पूर्वीपासून चालत आले आहे. विविध ठिकाणी गावपाड्यात अजूनही दिवाळीच्या आधी किल्ले साकारण्याची, ते सजवण्याची पद्धत आहे. पण, शहरी भागात ही पद्धत विस्मरणात जात असताना वसई विरारमध्ये मात्र ग्रामीण तसेच शहरी भागातील चिमुकल्यांनी एकत्र येत विविध प्रकारचे किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत.

लहान मुलांनी पारंपरिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने दगड माती, शाडू माती, विटा, लाकूड, कागद, शेण अशा विविध प्रकारच्या साहित्याचा वापर करत हे किल्ले साकारले आहेत. यामध्ये रायगड, सिंहगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पन्हाळा, मुरुड जंजिरा, भुदरगड, प्रतापगड अशा विविध किल्ल्यांचा समावेश आहे. किल्ल्यांचा देखावा साकारताना तो जमेल तितका हुबेहूब साकारण्याचा प्रयत्न मुलांनी केला आहे. तर किल्ल्यावर असलेले रणगाडे,  रक्षणासाठी असलेले मावळे,बुरुज, पारंपरिक घरे, शिवाजी महाराज यांचे स्मारक आदी गोष्टी किल्ल्यात दाखविण्यात आल्या आहेत. तसेच या किल्ल्यांच्या देखाव्यांना भेट देणाऱ्या नागरिकांना त्याबद्दलची माहिती मुलांकडून समजावून सांगितली जात आहे.

एक गाव एक किल्ला

गेल्या तीन वर्षांपासून आम्ही एक गाव, एक किल्ला या संकल्पनेंतर्गत दिवाळी सणाच्यादरम्यान किल्ले साकारत आहोत. गावातील लहान मुलं, नोकरदार तरुण असे सगळे मिळून पर्यावरणपूरक पद्धतीने किल्ला साकारतात. तर यंदा आम्ही शिवकालीन प्रतापगड किल्ला साकारला असल्याचे दरपाळे येथील वज्रेश चौधरी यांनी सांगितले.