वसई : महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असल्याने वसई विरार शहरात मोठ्या प्रमाणात पक्षांतरणाचे वारे वाहू लागले आहेत. शनिवारी वालीव भागातील बहुजन विकास आघाडी व शिवसेना ( ठाकरे गट) कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला.आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकी भाजपाने यश मिळविले होते.
त्यामुळे भाजपाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.आता महापालिकेत आगेकूच करण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे.विशेषतः भाजप कडून विरोधी पक्षाचे प्रमुख नेते, माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आपल्यात सामील करवून घेतले जात आहे.शनिवारी भाजपाच्या मुंबई प्रदेश कार्यालयात ही पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.यात बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेविका शकुंतला नागेश शेळके यांच्यासह गणेश धुमाळ,नागेश शेळके, रोहीत पाटील, जयेश धुमाळ, कल्पेश मोहीते, अंकुश शेळके, अनिल सिंह, राहुल सुमेरी, प्रकाश विटकर तर शिवसेना ( ठाकरे गट) भोयदापाडा शाखाप्रमुख शशिकांत अवघडे, आकाश मालेकर,उमेश नूलकर, दगडु वाघ, बबन वाघ, बाबु नायर, विनायक भोईर, बादल चौधरी, पप्पु शहाणी,किशोर मोहीते, कैलास मोहीते यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपप्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व वसईच्या आमदार स्नेहा दुबे- पंडित यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला.
त्यामुळे आगामी निवडणूकीच्या तोंडावर भाजपने एकप्रकारे बविआ आणि शिवसेना ठाकरे गटाला धक्का दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.वसई विरार महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक जवळ येत असतानाच भाजप मध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने यावर्षीची ही निवडणूक अतिशय चुरशीची ठरेल असेही सांगण्यात येत आहे.
