वसई: पावसाळा तोंडावर आला तरीही वसई विरार महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली नसल्याचे समोर आले आहे . त्यामुळे शहरातील धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
वसई विरार शहरातील विविध ठिकाणच्या भागात अनेक वर्षे जुन्या झालेल्या इमारती व बांधकामे आहेत. काही इमारतींचे बांधकाम हे फारच जीर्ण झाल्याने त्या धोकादायक अवस्थेत आहेत. कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी दरवर्षी महापालिकेकडून शहरात असलेल्या धोकादायक इमारती व अतिधोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. व त्यानंतर त्याची यादी तयार करून त्यांना नोटीसा पाठवून सूचना देण्यात येत असतात.
यामध्ये धोकादायक असलेल्या इमारतींची चार प्रकारात वर्गवारी केली जात असते यामध्ये अतिधोकादायक असलेल्या इमारती तात्काळ खाली करून जमिनदोस्त करायच्या असतात तर दुसऱ्या वर्गातील इमारती खाली करून त्या दुरुस्त केल्या जातात, तिसऱ्या वर्गात इमारती खाली न करता दुरुस्त केल्या जातात तर चौथ्या वर्गात इमारतींची डागडुजी केली जाते. परंतु पावसाळा तोंडावर आला तरीही पालिकेने धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली नाही. त्यामुळे शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर बनला आहे.मुंबई महानगर क्षेत्रात असलेल्या ठाणे, मीराभाईंदर अशा महापालिकांनी याद्या प्रसिद्ध करून उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे.असे असताना वसई विरार शहरातील यादी प्रसिद्ध करण्यास विलंब होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.यापूर्वी शहरात धोकादायक इमारती व जीर्ण इमारती यांचे बांधकामे कोसळून दुर्घटना घडल्या आहे.
विशेषतः अतिवृष्टी होते तेव्हा अशा घटना अधिक प्रमाणात घडतात. पालिका धोकादायक इमारतींच्या बाबत उदासीन असल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहेत.शहरा कोणत्या मोठ्या इमारत कोसळण्याच्या घटना घडू नये यासाठी पालिकेने वेळीच धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून त्यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पुरेसा वेळ मिळायला हवा
पावसाळा तोंडावर आला आहे. यासाठी धोकादायक अवस्थेत
इमारती असतील त्यांना वेळेआधीच सूचना करणे गरजेचे आहे कारण ते पुढील नियोजन करू शकतील. पावसाळा जवळ आल्यानंतर जर सर्वेक्षण केले तर ऐनवेळी नागरिकांची तारांबळ उडू शकते. यासाठी पुरेसा वेळ मिळायला हवा असे नागरिकांनी सांगितले आहे.
सर्वेक्षण सुरू असल्याचा दावा
पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी पालिकेकडून नऊ प्रभाग समिती मध्ये सर्वेक्षण करण्यात येत असल्याचा दावा वसई विरार महापालिकेने केला आहे. त्यांची वर्गवारी करून त्यांना नोटिसा काढून सूचना करण्यात येत आहेत. याशिवाय धोकादायक इमारतीच्या संदर्भात आवश्यक कारवाई ही सुरू असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सांगितले आहे.
संक्रमण शिबिराची अडचण कायम
धोकादायक व अतिधोकादायक इमारतीमध्ये रहिवासी राहत आहेत. त्यांना पालिकेकडून इमारत खाली करण्यात यावे अशा सूचना दिली जाते. असे जरी असले तरी या नागरिकांच्या राहण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध होत नाही. यामुळे अडचणी निर्माण होत असतात. काही वेळा सूचना करूनही नागरिक इमारती खाली करण्यास तयार होत नाही त्यामुळे ही अडचणी येत असतात.तर काहींना दुसऱ्या ठिकाणी भाड्याने घर घेणे किंवा नवीन घर घेणे शक्य होत नसल्याने इमारती खाली केल्या जात नाहीत.