वसई: ऐन दिवाळीत विरार येथील एका रहिवासी इमारतीतील रोहित्राचा(ट्रान्सफॉर्मर) स्फोट होऊन भीषण आग लागली होती. सोमवारी दुपारी ही घटना घडली असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सोमवारी सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना. ऐन दिवाळीत वसई विरारमध्ये विविध ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. विरार पश्चिमेला तिरुपती फेज दोन परिसर आहे. या परिसरातील पूनम रेसिडेन्सी सोसायटी या रहिवासी इमारतीच्या आवारातील रोहित्राचा अचानक स्फोट झाल्याची घटना घडली. रोहित्राला लागलेल्या या आगीत रोहित्र जळून पूर्णतः खाक झाले. तर या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अचानक लागलेल्या आगीमुळे इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

इमारतीतील रहिवाशांकडून या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. यानंतर लगेचच घटनास्थळी दाखल होत, महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी काही तासांच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सातत्याने रोहित्रांना आगी लागण्याच्या घटना समोर येत असल्याने पुन्हा एकदा रोहित्रांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रोहित्र दुर्घटना

२२ सप्टेंबर २०२५ – नालासोपारा पश्चिमेच्या डांगेवाडी येथे महावितरणच्या रोहित्राचा( ट्रान्सफॉर्मर) स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.

१९ जून २०२५ – नायगाव पश्चिमेच्या विजय पार्क परीसरात वादळीवाऱ्यामुळे महावितरणचे रोहित्र कोसळले होते. सुदैवाने त्यावेळी कोणीही जवळ नसल्याने मोठा अनर्थ टळला.