विरार : वसई विरार शहरात शारदीय नवरात्रोत्सवाला सोमवारपासून सुरुवात झाली. शहरातील प्रसिद्ध जीवदानी देवस्थानासह इतरही मंदिरात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. यावेळी नवरात्रोत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रम, होम हवन तसेच गरबा आणि दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ दिवस देवीचा जागर करण्यात येणार असून यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण देखील पाहण्यास मिळत आहे.

वसई विरार शहरात मोठ्या प्रमाणावर नवरात्रोत्सव साजरा केला जातो. विरारच्या जीवदानी देवी मंदिर, जूचंद्र येथील चंडिका देवी मंदिर, वसई किल्ल्यातील वज्रेश्वरी देवी मंदिर, मारंबळपाडा येथील सोनुबाई भवानी देवी मंदिर, खानिवडे येथील महालक्ष्मी देवी मंदिर, अर्नाळा किल्ल्यातील कालिका देवी मंदिर यासह अनेक मंदिरांमध्ये घटस्थापना करण्यात आली आहे.

नवरात्र काळात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता प्रसिद्ध मंदिरांच्या प्रशासनाकडून तसेच पोलीस प्रशासनाकडून गर्दी नियंत्रणासाठी विशेष सुरक्षा पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच मंदिराच्या परिसरासह गर्दीवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे.

वसई विरार शहरात सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांची संख्या मोठी आहे. विविध ठिकाणी यासाठी आकर्षक देखावे आणि आरास केली जाते. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेक मंडळांच्या मूर्तींचा आगमन सोहळा ढोल ताशा, लेझिम आणि बॅण्डच्या साथीने उत्साहात पार पडला तर सोमवारी घटस्थापना करण्यात आली. अनेक ठिकाणी यावेळी गरबा आणि दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे.

जीवदानी मंदिरात घटस्थापना

विरारच्या प्रसिद्ध अशा जीवदानी मंदिरात सोमवारी सकाळी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. यानिमित्त महाभिषेक, वस्त्रालंकार, शृंगार आणि नवचंडी वाचन करण्यात आले. यावेळी मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली असून नवरात्रीनिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात विविध फुलांची सजावट करण्यात आली आहे. नवरात्री काळात श्री.जीवदानी देवी संस्थांनाकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नवरात्र काळात मंदिरात लाखो भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर आणि परिसरावर १६० सीसीटीव्ही कॅमेरांची नजर असणार आहे. तर यावेळी पोलिसांसह, विवा महाविद्यालयाचे एनएसएसचे दोनशे विद्यार्थी आणि मंदिर संस्थांनाचे शंभर गार्ड ही मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.