सध्या स्थितीमध्ये वसई विरार शहर हे गजबजू लागले आहे. विविध मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या बेसुमार वाढत आहे. यामध्ये विशेषतः रेल्वे मार्गातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. दररोज येथील नागरिकांना लोकल ट्रेनने विरार ते चर्चगेट या दरम्यान धोकादायक प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. असा धोकादायक प्रवास रोखण्यासाठी व गर्दी नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना न झाल्याने हा प्रवास दिवसेंदिवस अधिकच जिकरीचा बनू लागला असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
मुंबई या शहराला लागूनच असलेला वसई विरारचा परिसर आता वेगाने विकसित होऊ लागला आहे. त्यातच नव्याने तयार होत असलेले गृहसंकुले, बैठ्या चाळी, छोटे मोठे उद्योग कारखाने पर्यटनस्थळे अशा विविध कारणांमुळे वसई विरारच्या दिशेने नागरिकांचा ओढा अधिकच वाढला आहे. सध्या स्थितीत पालिकेच्या आकडेवारीनुसार ही लोकसंख्या २५ लाख असली प्रत्यक्षात लोकसंख्या ही ४० लाखांच्या आसपास गेली आहे.या भागात ये जा करण्यासाठी अन्य दळणवळण करण्याचे मार्ग असले तरीही रेल्वे मार्ग हा प्रवासासाठीची जीवनवाहिनी मानली जात आहे.
दररोज लाखोच्या संख्येने नागरिक वसई विरार मधून मुंबईला प्रवास करत आहेत. मुंबईला जाण्यासाठी लोकल ट्रेन हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे विरार आणि नालासोपारा रेल्वे स्थानकात मोठी गर्दी उसळत असते. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेला फलाटावर पाय ठेवायला देखील जागा नसते. विशेषतः नालासोपारा हे रेल्वे स्थानक सर्वाधिक गर्दीचे ठिकाण आहे. तर काही वेळा तांत्रिक अडचणमुळे लोकल विस्कळीत झाली तेव्हा तर लोकल मध्ये चढणे तर दूरच मात्र रेल्वे स्थानकातील धक्काबुक्कीला प्रवाशांना तोंड द्यावे लागत आहे. दिवसेंदिवस प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे विविध प्रकारच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.
लोकसंख्या वाढल्याने लोकल ट्रेनवर प्रचंड ताण येऊ लागला आहे. त्यामुळे अक्षरश: लोकल ट्रेनमध्ये कोंबून प्रवास करावा लागतो. त्याचा सगळ्यात मोठा धोका असतो तो खचाखच भरलेल्या गर्दीच्या ट्रेन मधून खाली पडण्याचा. नुकताच ठाण्याच्या जवळील मुंब्रा येथे लोकल मधून १३ प्रवासी पडले यात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घडलेल्या घटनेनंतर पुन्हा एकदा रेल्वे सुरक्षेचा प्रश्न प्रकर्षणाने समोर आला आहे.
लोकलची वाढती गर्दी आता नागरिकांच्या जीवावर बेतू लागली आहे. मध्यंतरी रेल्वे प्रशासनाने गर्दी नियंत्रणाच्या दृष्टीने स्थानकांचा विस्तार केला. तर लोकलचे१२ डब्याचे १५ डबे केले. यामुळे तरी प्रवाशांचा प्रवास सुलभ होईल. असे वाटले होते मात्र आजही प्रवाशांना कामाचे ठिकाण गाठण्यासाठी दरवाजात उभे राहून लटकत प्रवास करावा लागत आहे. या लटकत प्रवासामुळे अनेकदा तोल जाऊन खाली पडून अपघात घडले आहेत. मीरारोड ते वैतरणा या रेल्वे स्थानकाच्या दरम्यान मागील दीड वर्षात सुमारे २८४ प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. यात ६१ जणांचा लोकल मधून पडून मृत्यू झाला आहे. याशिवाय पडून जखमी होणाऱ्यांचे प्रमाण अधिक असून दीड वर्षात १८० प्रवासी ही पडून जखमी झाले आहेत. यावरूनच लोकलच्या वाढत्या गर्दीचा प्रवास कसा धोकादायक ठरत आहे याचा प्रत्यय येत आहे. ही वाढती गर्दी नियंत्रणात आणणार कशी ? असा प्रश्न आता प्रशासना समोर उभा राहिला आहे. गर्दी नियंत्रणासाठी लोकल वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत.
सद्यस्थितीत विरार ते चर्चगेट अशा दिवसाला साध्या लोकलच्या २२४ फेऱ्या ये -जा होतात. वातानुकूलित लोकलच्या ५७ फेऱ्या आहेत. मात्र त्या ही अपुऱ्या पडू लागल्याने विरार ते बोरिवली दरम्यान पाचव्या व सहावी मार्गिका तयार करून लोकल फेऱ्या वाढविण्यात येतील असे सांगण्यात येत आहे. अजूनही काम ही सुरू झाले नसल्याने ते काम कधी पूर्ण होईल याबाबत ही साशंकता आहे.तो पर्यंत मात्र प्रवाशांना लटकत, धक्के खात धोकादायक प्रवास करावा लागणार आहे.
शासन स्तरावरून प्रयत्न असायला हवे….
रेल्वे प्रवासी वाहतुकीवरील ताण वाढत आहे. रेल्वे प्रशासन त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत असले तरीही वाढत्या गर्दीपुढे ते ही हतबल होऊ लागले आहे. यात शहरात वाढत जाणारी गर्दी नियंत्रणासाठी राज्य व केंद्र शासन अशा स्तरावरून प्रयत्न होणे आवश्यक बनले आहेत.
मुंबईत घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या तेथे घर घेणे शक्य नाही तर दुसरीकडे भाड्याने राहायचे म्हटले तर तुटपुंज्या वेतनात तेही जमू शकत नाही. त्यामुळे सर्वसामान्य व कष्टकरी माणसांना आज स्थलांतर करून वसई विरार भागात यावे लागत आहे. तर हळूहळू हे नागरिक आता पालघर कडे ही राहण्यास जात आहे. अशाने शहरातील गर्दी वाढतच जाणार आहे. जर शासन स्तरावर निर्णय घेऊन मुंबई सारख्या भागातच त्यांना योग्य दरात राहण्याची व्यवस्था उपलब्ध झाली तर ती गर्दी इथपर्यंत वाढणार नाही. तर दुसरीकडे वसई विरारच्या मधील अनधिकृत बांधकामे थांबली तर लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल. नोकरी, धंदे, शिक्षणासाठी वसई विरार मधून मुंबईला जात असतात. हेच उद्योग, नोकर्या शैक्षणिक संस्था, रुग्णालये वसई विरार भागात उभारले तर मुंबईला जाणारी गर्दी कमी करता येऊ शकेल. याशिवाय वाहतुकीचे अन्य मार्गही विकसित होणे आवश्यक आहे. यात मेट्रो सुविधा, रेल्वे समांतर रस्ते अशा पर्यायी रस्त्यांची व्यवस्था होणे गरजेचे बनले आहे.
गर्दीमुळे गुन्हेगारीतही वाढ
रेल्वेच्या गर्दीचा फायदा आता भुरटे चोर घेऊ लागले आहेत. रेल्वे स्थानकातील वाढत्या गर्दीमुळे सोनसाखळी चोरी, पाकीट मारी, बॅग लिफ्टिंग, मोबाईल चोरी, मारामारीच्या घटना, महिला छेडछाडीचे प्रकार अशा विविध प्रकारचे गुन्हे घडू लागले आहेत. तर दुसरीकडे दरवाज्यात उभे असलेल्या प्रवाशांच्या हातावर फटके मारून ही मोबाईल चोरीचे प्रकार घडत असतात. वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतच पाच महिन्यात सुमारे २७० गुन्ह्यांची नोंद झाली आहे. अशा गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करीत आहे. मात्र त्यांच्याकडे अपुरे मनुष्यबळ आहे. वाढत्या गर्दीत रेल्वे पोलीस कुठे कुठे गस्त घालणार हा सुद्धा मोठा प्रश्न आहे.
रेल्वेतील सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षाबल यांनी संयुक्त रित्या उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. यावर उपाययोजना झाल्या तर रेल्वे सुरक्षेला बळकटी मिळेल.