वसई : वसई विरार महापालिकेचे नवीन आयुक्त म्हणून मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. यावेळी मावळते आयुक्त अनिलकुमार पवार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शहरातील आरोग्य व्यवस्था, शाळा, मैदाने, स्वच्छता व पाणी पुरवठा यासह शहराच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाईल असे नवनियुक्त आयुक्तांनी सांगितले.

वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांचा ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागेवर मनोजकुमार सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सूर्यवंशी हे वसई विरार महापालिकेचे ८ वे आयुक्त आहेत. सूर्यवंशी हे यापूर्वी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत होते. त्याआधी त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी सहकारी महामंडळाची जबाबदारीही सांभाळलेली आहे.

सोमवारी त्यांनी वसई विरार महापालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्यात दिवशी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची संवाद साधून शहरातील प्रमुख समस्या व कार्यक्षेत्रातील प्रकल्पांविषयी माहिती घेतली. शहरात खेळाची मैदाने विकसित करून मुलांना मैदानी खेळाकडे वळविणे या बाबीवर प्रामुख्याने भर देत आरोग्य सेवा सुधारणे, नागरी सोयी- सुविधा, शाळा, शहराचा सर्वांगीण विकास करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनिलकुमार पवारांचा निरोप समारंभ

वसई विरार महापालिकेचे मावळते आयुक्त अनिलकुमार पवार यांची मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. सोमवारी पालिकेच्या सभागृहात पवार यांचा छोटेखानी निरोप समारंभ पार पडला. यावेळी आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित, आमदार स्नेहा दुबे पंडित, माजी आमदार क्षितीज ठाकूर, माजी महापौर राजीव पाटील, नारायण मानकर, रुपेश जाधव, अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यासह मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.