वसई:- वसई विरार शहरात अनेक ठिकाणच्या भागात महावितरणची रोहित्र उघड्या अवस्थेत आहेत. यामुळे विविध दुर्घटना ही समोर येत असतात. अशा घटना टाळण्यासाठी आता महावितरणकडून रोहित्रांना सुरक्षा जाळ्या बसविल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात १०१ ठिकाणी अशा सुरक्षा जाळ्या बसविल्या जाणार आहेत.
वसई विरार शहरात महावितरण कडून नागरिकांना वीज पुरवठा केला जातो. वीज पुरवठा करण्यासाठी जागोजागी वीज रोहित्र ( ट्रान्सफॉर्मर ) बसविले आहेत. सद्यस्थितीत जवळपास ६ हजारांहून अधिक रोहित्र आहेत. शहरात अनेक धोकादायक रोहित्र असून त्यामुळे नागिरकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. महावितरणाच्या गलथान कारभाराचा फटका वसई विरारच्या नागरिकांना बसत असतो. आता जागोजागी असलेल्या उघड्या रोहित्रांमुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणे सुद्धा धोकादायक ठरत असते. महाविरणाचा बेजबाबदार कारभार आणि अक्षम्य दिरंगाईमुळे उघड्यावर धोकादायक अवस्थेत असलेल्या रोहित्रांमुळे निष्पाप नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या उघड्या रोहित्रांमुळे दुर्घटना होऊन अनेकाचे बळी गेले आहेत. रस्त्याच्या कडेला अनेक रोहित्र असून त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असतो.
काही रोहित्र ही अगदी दाट लोकवस्ती व रहदारी असलेल्या मार्गावर आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याचा फटका नागरिकांना बसू शकतो. नुकताच नालासोपारा पश्चिमेच्या डांगेवाडी परिसरात रोहित्राला आग लागून जीवितहानी झाली होती.
या पार्श्वभूमीवर उघड्यावर धोकादायक अवस्थेत असलेल्या सर्व रोहित्रांना तातडीने सुरक्षा जाळ्या (सेफ्टी बॉक्स) बसवावेत अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आता वसई विरार शहरात रोहित्रांना सुरक्षा जाळ्या बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात वसईत ४० आणि विरार मध्ये ६१ ठिकाणी अशा १०१ ठिकाणी सुरवातीला जाळ्या बसविल्या जातील असे महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांनी सांगितले आहे.
एफ आर पी जाळ्या लावणार
महावितरणने वीजसुरक्षेच्या दृष्टीने परंपरागत लोखंडी संरक्षक जाळ्या बसविल्या आहेत. अनेकदा या लोखंडी जाळ्या गंजणे, सडणे, तुटणे, वाकणे, मोडतोड करून चोरीद्वारे भंगारात विकणे आदी प्रकार होत आहेत. यामुळे लोखंडी कुंपणाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी महावितरणला सातत्याने उपाययोजना करावी लागत होती. तर काही भागात संरक्षक जाळ्या नसल्याने रोहित्र ही उघड्या अवस्थेत आहेत. यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. यावर कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून आता लोखंडाऐवजी फायबर रीइन्फोर्स प्लॅस्टिकचा पर्याय वापरून फायबर प्लॅस्टिकच्या संरक्षक जाळ्या बसविण्यात येतील
महावितरणकडून आता नवीन जाळ्या लावण्यात येणार आहेत. त्यासाठीची मंजुरी ही देण्यात आली आहे. त्यामुळे जिथे अधिक धोकादायक ठिकाणे आहेत तिथे प्राधान्याने या जाळ्या लावल्या जातील.- संजय खंडारे, अधीक्षक अभियंता महावितरण वसई
