वसई : मागील अनेक वर्षांपासून पालिकेचे फेरीवाला धोरण निश्चित न झाल्याने फेरीवाल्यांची मोठी समस्या निर्माण झाली होती. यावर तोडगा काढण्यासाठी अखेर पालिकेने फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. सद्यस्थितीत ९ प्रभागात ८७ फेरीवाला झोन (Hokers Zone)तात्पुरता स्वरूपात तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांमुळे रहदारीच्या मार्गात निर्माण होणारे अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे.
वसई विरार शहरात वाढत्या नागरिकरणाच्या सोबतच फेरीवाल्यांची संख्या बेसुमार वाढली आहे. फेरीवाले शहरात मुख्य रस्ते, ये जा करण्याचे मार्ग, छोट्या गल्ल्या आणि फुटपाथ अशा मिळेल त्या जागी आपले बस्तान मांडून बसत आहेत. वाढत्या फेरीवाल्यांच्या संख्येमुळे ही समस्या आता अधिकच जटिल झाली आहे. या समस्येमुळे नागरिकांना वाहतूक कोंडी, ये जा करण्यास अडचणी निर्माण होत असतात .. यासाठी मागील पाच ते सहा वर्षापूर्वी फेरीवाला धोरण निश्चित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र विविध अडचणीमुळे तो प्रस्ताव मार्गी लागला नव्हता.
फेरीवाल्यांची दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या ही डोकेदुखी ठरत असल्याने यावर तोडगा काढण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत होती. शहरात फेरीवाले धोरण निश्चित केल्यानंतर वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटून पालिकेच्या उत्पन्नात भर पडेल असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात होते.अखेर पालिकेने फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीला सुरवात केली आहे. या फेरीवाला धोरणासाठी तात्पुरता फेरीवाला शहर पथविक्रेते समिती नियुक्त करण्यात आली आहे. त्यांच्या शिफारशी नुसार पहिल्या टप्प्यात नऊ प्रभागाचे सर्वेक्षण करून ८७ ठिकाणी तात्पुरता स्वरूपात फेरीवाला बसवण्यासाठीच्या जागा निश्चित केल्या आहेत. निश्चित केलेल्या जागांच्या संदर्भात नागरिकांना काही हरकती किंवा सूचना असतील तर त्या मांडण्यासाठी ४ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२५ अशी तीस दिवसांची मुदत ही देण्यात आली असल्याचे महापालिका उपायुक्त स्वाती देशपांडे यांनी सांगितले आहे.
असे असेल फेरीवाला धोरण
पालिकेकडून फेरीवाल्यांना बसण्यासाठीची जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यात विशेषतः मोकळ्या जागा यांचा विचार करून स्थळ निश्चित केले आहे. याशिवाय जेरहदारीच्या मार्गात अडथळे निर्माण करणारे फेरीवाले हटविणे, सूचना फलक लावणे अशा विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत असे पालिकेने सांगितले आहे. जे फेरीवाले नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा ही पालिकेने दिला आहे.
प्रभावी अंमलबजावणी असायला हवी
सद्यस्थितीत शहरात फेरीवाल्यांची संख्या पाहता जागोजागी फेरीवालेच दिसून येत आहेत. याच फेरीवाल्यांचा मोठा मनस्ताप सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. विशेषतः नालासोपाऱ्यात सर्वाधिक फेरीवाले हे फुटपाथ, रस्ते असे सर्वच अडवून बसतात. त्यावर वेळोवेळी कारवाई होत नाही अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. पालिका फेरीवाला धोरण निश्चित करते ही चांगली बाब असली तरी त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
प्रभाग निहाय फेरीवाला क्षेत्र
प्रभाग समिती (ए) – ०९
प्रभाग समिती ( बी) – १३
प्रभाग समिती (सी)-११
प्रभाग समिती (डी) -०४
प्रभाग समिती (ई) – ०७
प्रभाग समिती ( एफ)- ११
प्रभाग समिती ( जी) – ७
प्रभाग समिती (एच)- ०४
प्रभाग समिती (आय)- २१
एकूण – ८७
