वसई: शनिवारी अनंत चतुर्थीच्या दिवशी गणरायाला निरोप दिला जाणार आहे. वसई विरार मध्ये विसर्जन सोहळ्यासाठी सार्वजनिक आणि घरगुती गणेशमुर्तींच्या विसर्जन मिरवणूका निघणार आहे. हा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी वसई विरार महापालिका व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. यावेळी पालिकेकडून साडेतीन हजाराहून अधिक मनुष्यबळ तसेच अडीच हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.
२७ ऑगस्ट पासून वसई विरार व मीरा भाईंदर शहरात गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळाला. शनिवारी दहा दिवसांच्या बाप्पाला भक्तीभावाने निरोप दिला जाणार आहे. यावेळी विसर्जनासाठी पालिकेकडून ११६ कृत्रिम तलावांची निर्मिती, १८ फिरते हौद, २ खदानीच्या ठिकाणी कन्वेअर बेल्ट सुविधा उपलब्ध केली आहे. अनंत चतुर्दशीला मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन होत असते. अशा मोठ्या मूर्त्यांच्या विसर्जनासाठी पालिकेने शहरातील ६ जेट्टीच्या ठिकाणी विशेष तयारी केली आहे. तसेच बोटी व तराफे अशी विसर्जनाची सुविधा केली आहे. त्याठिकाणी विसर्जनासाठी पालिकेचे कर्मचारी असणार आहेत.
तर दुसरीकडे नागरिकांना विसर्जनाचे स्थळ माहिती मिळावी यासाठी जिओ टॅग लोकेशन सुध्दा तयार केले आहे. निर्माल्य तलवात व नदीत टाकू विसर्जन करू नये यासाठी जागोजागी निर्माल्य कलश सुद्धा ठेवले आहे. अग्निशमन विभागाच्या वतीने समुद्र किनारी विसर्जन स्थळी लाईफ जॅकेट, रिंग, गळ, बोट, मेगा फोन, दोरी अशा रेस्क्यू साहित्यासह अग्निशमन पथक तैनात ठेवण्यात येणार आहे. तसेच जीवरक्षकांची नेमणूकही केली जाणार आहे. यावेळी विसर्जन ठिकाणी घडणाऱ्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असल्याचे महापालिकेने सांगितले आहे.
विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पालिकेचे आयुक्त , अतिरिक्त आयुक्त , सर्व उपायुक्त , सहाय्यक आयुक्त यांच्यासह अधिकारी व कर्मचारी असे साडेतीन हजार इतके मनुष्यबळ उपलब्ध असणार आहे. नागरिकांनी सुद्धा आनंदी वातावरणात विसर्जन सोहळा पार पडावा यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही महापालिका प्रशासन व पोलिसांनी केले आहे.
आरोग्य सेवा सज्ज
विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान एखादी दुर्घटना घडल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार मिळावे यासाठी वैद्यकीय आरोग्य विभागाकडून प्रभाग निहाय आरोग्य पथके ही विसर्जन स्थळी नियुक्त केली आहेत. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत गरज पडल्यास रुग्णवाहिका ही उपलब्ध केल्या जाणार आहेत.
विसर्जनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
वसई विरार व मीरा भाईंदर शहरात अनंत चतुर्थीच्या दिवशी सहा हजाराहून अधिक सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्त्यांचे विसर्जन पार पडणार आहे. त्यामुळे विविध ठिकाणी मोठ्या जल्लोषात विसर्जन मिरवणुका काढल्या जाणार आहेत. या विसर्जना दरम्यान कायदा सुव्यवस्था यासह कोणत्याची प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. मीरा भाईंदर – वसई विरार पोलीस आयुक्तालया मार्फत पोलीस उपायुक्त – ५ , सहाय्यक पोलीस आयुक्त – ९ , इतर पोलीस अधिकारी – २८० , पोलीस अंमलदार – २ हजार ३००, होमगार्ड – २०० महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी – २३० असा अडीच हजाराहून अधिक पोलिसांचा फौजफाटा शहरातील मिरवणूक मार्ग, विसर्जन ठिकाणी, महत्त्वाच्या ठिकाणी तैनात असणार आहे. यात रेल्वे पोलीस व सीआरपीएफ यांच्या तुकड्यांचा ही समावेश आहे. तर दुसरीकडे मिरवणुकीच्या गर्दीत चोरीच्या घटना, महिलांच्या छेडछाडीचे प्रकार घडण्याची शक्यता असते त्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांची गस्ती पथके नेमली जाणार आहे. यामुळे विसर्जना मिरवणुकीच्या एकूणच हालचालीवर पोलिसांकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे. तर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी जागोजागी वाहतूक पोलीस नेमून वाहतूक नियंत्रित केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
शहरातील एकूण गणपती मूर्ती
सार्वजनिक, घरगुती
६२३, ५ हजार १९५