वसई: पाऊस थांबताच वसई विरार शहरातील विविध ठिकाणी रस्त्यावर धुळीचे साम्राज्य तयार झाले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांतील कोरड्या चिखलामुळे निर्माण झालेल्या धुळीच्या त्रासाने शहरभर अक्षरशः धुरकट वातावरण तयार झाले आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. तसेच या प्रदूषणामुळे आजाराचा धोका वाढला आहे.
पावसामुळे शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यातील व रस्त्यावर साचलेला चिखल आता सुकण्यास सुरवात झाली आहे. त्या चिखलाचे रूपांतर आता धुळीत होऊ लागले आहे. हीच धूळ आता हवेद्वारे सर्वत्र पसरू लागली आहे. त्यामुळे विविध ठिकाणच्या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात धुळीचे साम्राज्य तयार होऊ लागले आहे.
त्याचा त्रास रस्त्यावरून ये जा करणारे दुचाकीस्वार, रिक्षा चालक, पादचारी नागरिक, शाळकरी विद्यार्थी यांना याचा त्रास करावा लागत आहे.याशिवाय रस्त्यालगत असलेले दुकानदार ही धुळीने त्रस्त झाले आहेत.
वसई, नालासोपारा, विरार, नायगाव या भागातील मुख्य रस्ते व शहरांतर्गत रस्ते अशा सर्वच ठिकाणी रस्ते दिवस भर रस्ते धुळीने भरलेले असतात. पावसात खड्डे बुजवता येत नसल्याचे कारण पालिकेने दिले होते. मात्र आता पाऊस थांबून आठवडा उलटून गेला तरीही त्यावर कोणत्याही उपाययोजना करण्यास सुरूवात केली नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
रस्त्यावर धुळीचे वाढते साम्राज्य लक्षात घेता तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. रस्त्यांची दुरुस्तीची कामे सुरू आहेत. रस्ते दुरुस्त झाल्यानंतर हे प्रमाण कमी होईल असे पालिकेकडून सांगण्यात येत आहे.
नागरिक आरोग्य धोक्यात
शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यावर दिवसभर धुळीचे वातावरण असते. त्या धुळीमुळे श्वसनाच्या आजाराचा धोका वाढला आहे. धूळ नागरिकांच्या नाका तोंडात जाऊन सर्दी, खोकला, असे आजार होऊ लागले आहेत असे नागरिक सांगत आहेत. या होत असलेल्या धूलिकण नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
प्रदूषण नियंत्रण यंत्रणा कुचकामी
पालिकेने रस्त्यावर होणारे प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने रस्ते सफाई यंत्र घेतली आहेत. तर दुसरीकडे हवेत उडणारे धुळीकण नियंत्रणासाठी फॉग कॅनन वाहने पालिकेने घेतली आहेत.मात्र योग्य वेळी ही वाहने वापरात येत नसल्याने ही यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.