वसई: वसई विरार शहरात रिक्षाचालकांची वाढलेली मुजोरी, नियमबाह्य पद्धतीने चालविल्या जाणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. सहा महिन्यात परिवहन विभागाने १ हजार ४५७ ऑटोरिक्षांवर कारवाई करीत १ कोटी ५ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. यातील सर्वाधिक कारवाई ही सप्टेंबर महिन्यात करण्यात आल्या आहेत.
वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव या चारही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक रिक्षाने प्रवास करतात. गेल्या काही काळात वाढत्या लोकसंख्येसह शहरातील रिक्षांच्या संख्येतही वाढ झाली आहे. तर रिक्षाचे परवाने खुले झाल्यापासून रिक्षाचालकांच्या संख्येत अजून भर पडली आहे. पण याचबरोबर रिक्षाचालकांकडून केल्या जाणाऱ्या मुजोरीचे प्रकारही दिवसेंदिवस वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तर काही रिक्षा चालक हे बेकायदेशीर पणे रिक्षा चालवित असल्याचे प्रकार घडत आहे.
मुख्य रस्ते, रेल्वे स्थानक परिसर, रहदारीची सार्वजनिक ठिकाणे अशा ठिकाणी बेशिस्तपणे रिक्षा उभ्या केल्या जातात त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. याशिवाय अतिरिक्त भाडे आकारणे, प्रवाशांसोबत गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी परिवहन विभागाकडे आल्या होत्या. त्यातच संतप्त झालेल्या प्रवाशांनी काही रिक्षा चालकांच्या मनमानी कारभाराबद्दल थेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सुद्धा तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर वसईच्या प्रादेशिक परिवहन विभागाने नियमबाह्य पध्दतीने वावरणाऱ्या रिक्षाचालकांच्या विरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
यासाठी पालघर जिल्ह्यात आठ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधी मध्ये ५ हजार ६९० रिक्षांची तपासणी करण्यात आली असून त्यात १ हजार ४५७ रिक्षा दोषी आढळून आल्याने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून १ कोटी ५ लाख इतका दंड ही वसूल करण्यात आला आहे.
या केलेल्या कारवाईत अतिरिक्त प्रवासी वाहतूक, चालकाचे शेजारी बसून प्रवासी वाहतूक करणे, मीटर नादुरुस्त किंवा मीटर बसवलेले नसणे, वाहनांची कागदपत्रांची वैधता संपलेली, गणवेश परिधान न करणे, वाहन चालकाची अनुज्ञप्ती किंवा बॅच वैध नसणे अशा स्वरूपाच्या कारवाया केल्या असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाने सांगितले आहे.
परिवहन मंत्र्यांच्या आदेशानंतर कारवाईला वेग
नुकताच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महापालिकेत घेतलेल्या लोकदरबारात नागरिकांनी रिक्षा चालकांच्या मनमानी कारभाराबद्दल तक्रारी केल्या होत्या. यावर कारवाई करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर कारवाईला वेग आला असून एका सप्टेंबर महिन्यात २ हजार ७१३ रिक्षा तपासल्या त्यात ६०५ रिक्षांवर कारवाई करत २५ लाखांचा दंड वसूल केला आहे.
मागील अडीच वर्षातील कारवाई
वर्ष – तपासणी – दोषी – दंड (लाखात)
२०२३-२४ – ४४२२ – १५२० – २०.१५
२०२४-२५ – ४८२६ – १७०५ – १३३.६५
२०२५- २६ – ५६९० – १४५७ – १०५.११
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथके नियुक्त केली आहेत.मागील महिन्यात ही मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. :- अतुल आदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी वसई.