वसई: दिवाळीच्या दिवसात शहरात झालेल्या आतषबाजीमुळे तसेच रस्त्यावरील धूळप्रदूषणामुळे वसई विरारमधील हवेची गुणवत्ता खालावली होती. पण शुक्रवारपासून शहरात सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे हवेची गुणवत्ता सुधारली असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

हवामान विभागाकडून पुढील काही दिवस शहरात पावसाच्या हलक्या सरी बरसणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यानुसार वसई विरार शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आहे. या अवकाळी पावसामुळे दिवाळीदरम्यान फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे तसेच वाढलेल्या दळणवळणामुळे खालावलेल्या हवेच्या गुणवत्तेत बराच फरक पडला आहे. नरकचतुर्दशी (२१ ऑक्टोबर) दिवशी १७५ या धोकादायक पातळीवर पोहोचलेला हवेचा गुणवत्ता निर्देशांक आता ५३ इतका नोंदवण्यात आला आहे. परिणामी शहरातील वायू प्रदूषणातही घट झाली आहे.

१९ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर या पाच दिवसाच्या कालावधीत शहरातील हवेच्या गुणवत्तेत घट झाली होती. सरासरी १०० ते ११५ वर शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक पोहोचला होता. तसेच, रस्त्यावर साचलेली धूळ, शहरात सुरू असलेले बांधकाम यांमुळे वायू प्रदूषणात अधिकच भर पडली होती. पण, अचानक सुरू झालेला अवकाळी पावसामुळे शहरातील हवेचा गुणवत्ता सुधारली आहे.

अवकाळी पावसामुळे उष्णतेत घट

शहरातील हवेच्या गुणवत्तेप्रमाणे अवकाळी पावसामुळे शहरातील तापमानातही काहीशी घट झाली आहे. १९ ते २३ ऑक्टोबर दरम्यान ३१ ते ३३ डिग्री सेल्सिअसवर पोहोचले होते. पण, पावसामुळे तापमानात घट झाल्यामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे.