scorecardresearch

सूर्या प्रकल्पातील अतिरिक्त पाण्याची प्रतीक्षा कधी संपणार?

काम अंतिम टप्प्यात असूनही लवकरच हे पाणी वसई विरारला मिळणार आहे. नेमका हा प्रकल्प कसा आहे? हे पाणी वसईकरांना कसे मिळणार? सध्याची स्थिती काय आहे, यांचा आढावा…

water supply to vasai virar from surya regional water supply project
सूर्या प्रकल्पातील अतिरिक्त पाण्याची प्रतीक्षा कधी संपणार? (संग्रहित छायाचित्र)

वसई विरारकरांची तहान भागवण्यासाठी सूर्या पाणी प्रकल्पातून १८५ दशलक्ष लिटर पाणी एमएमआरडीएतर्फे देण्यात येणार आहे. काम अंतिम टप्प्यात असूनही लवकरच हे पाणी वसई विरारला मिळणार आहे. नेमका हा प्रकल्प कसा आहे? हे पाणी वसईकरांना कसे मिळणार? सध्याची स्थिती काय आहे, यांचा आढावा…

सध्या वसई विरार शहराला किती पाणी मिळते?

वसई विरार शहराला सूर्या प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्यांतून २०० दशलक्ष लिटर, पेल्हार धरणातून १० दशलक्ष आणि उसगाव धरणातून २० दशलक्ष लिटर असा एकूण २३० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Anil Parab Supreme Court Rahul Narwekar
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त

वसईला पाण्याची गरज किती? तूट किती भेडसावते?

वसई विरार शहराची लोकसंख्या आता २४ लाख एवढी आहे. या लोकसंख्येनुसार शहराला ३७२ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. मात्र केवळ २३० दशलक्ष लिटर पाणी मिळते. त्यातही पाण्याच्या गळतीचे प्रमाण हे २० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना प्रत्यक्षात केवळ १९० दशलक्ष लिटर पाणी मिळते. सध्या शहराला दररोज १४२ दशलक्ष लिटर पाण्याची तूट भेडसावत आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत जलजोडण्याधारकांकडून पाण्याची वाढती मागणी पाहता पाणीसाठा अपुरा पडत आहे.

वसईला पाणी देण्यासाठी सूर्याची काय योजना आहे?

वसई विरार शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची तूट लक्षात घेऊन एमएमआरडीएने सूर्या प्रकल्पातून अतिरिक्त ४०३ दशलक्ष लिटर पाणी देण्याची योजना आणली आहे. त्यातील १८५ दशलक्ष लिटर पाणी वसई विरार शहरासाठी आणि २१८ दशलक्ष लिटर पाणी मीरा भाईंदर शहरासाठी देण्याची योजना आहे. या प्रकल्पाच्या प्रस्तावाला १९ ऑक्टोबर २०१६ मध्ये तसेच १९७७.२९ कोटी रुपयांच्या खर्चास प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्यानंतर कामाला सुरुवात झाली.

प्रकल्पाचे किती काम झाले?

आतापर्यंत कवडास येथील उदंचन केंद्राचे बांधकाम, सूर्या नगर येथील जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात आले आहेत. कवडास उदंचन केंद्रापासून ते काशिदकोपर जलकुंभापर्यंत ५७ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. तुंगारेश्वर येथे बोगदा तयार करण्यात आला आहे. वसई विरार शहराला पाणी देण्यासाठी काशिदकोपर येथे संतुलन टाकी बांधण्यात आली आहे. मीरा भाईंदर शहरासाठी चेने येथे बांधण्यात येणाऱ्या संतुलन टाकीच्या राफ्टचे काम प्रगतिपथावर आहे.

एमएमआरडीएला हे पाणी कसे मिळणार?

सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या आराखड्यानुसार सूर्या धरणाजवळील कवडास बंधाऱ्यातून हे पाणी उचलण्यात येईल. त्यानंतर हे उचलण्यात आलेले पाणी सूर्यानगर येथील जलप्रक्रिया केंद्रात शुद्ध करण्यात येईल. शुद्ध केलेले पाणी राज्य महामार्ग, जिल्हा परिषद रस्ता आणि मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ च्या बाजूने टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीद्वारे वसई-विरार पालिकेकरिता काशिदकोपर येथील जलाशयात आण्यात येतील. मीरा-भाईदर महापालिकेकरिता घोडबंदर-चेने येथील जलाशयापर्यंत पाठविण्यात येईल.

वसई विरार महापालिका शहरांतर्गत पाणी कसे वितरित करणार?

एमएमआरडीएकडून आलेले अतिरिक्त १८५ दशलक्ष लिटर्स पाणी शहरांतर्गत वितरणासाठी पालिकेने रुपये १३९ कोटींची योजना तयार केली आहे. केंद्र शासनाच्या अमृत ०१ अंतर्गत निधी मिळाला आहे. एमएमआरडीएकडून उपलब्ध होणारे पाणी काशिदकोपर जलकुंभ महापालिका क्षेत्रात आणण्याकरिता महापालिकेमार्फत रुपये १०० कोटींची स्वतंत्र जलवाहिनी काशिदकोपर ते वसई फाट्यापर्यंत अंथरण्यात येत आहे. त्यानंतर महापालिकेतर्फे शहरात हे पाणी वितरित केले जाईल. यापूर्वी अमृत १ योजनेतून शहरांतर्गत २८४ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या अंथरण्यात आल्या असून १७ जलकुंभ तयार करण्यात आले आहे. आतापर्यंत १२६ कोटी १० लाखांचे काम पूर्ण झाले आहे. त्यापैकी ३ कोटी ७२ लाख सौर ऊर्जेसाठी खर्च झाले आहेत. पालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ५७ कोटींच्या जलवाहिन्या घेतल्या असून उर्वरित ६९ कोटींची कामे केली आहेत.

पाण्याला विलंब का?

अतिरिक्त पाणी योजना मागील वर्षी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक कामामुळे विलंब झाला. आता योजनेचे काम पूर्ण झाले तरी पाणी देत येत नाही. या योजनेसाठी ६० किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीतून हे पाणी देण्यात येणार आहे. त्यासाठी चाचणी करावी लागते. ही चाचणी सुरू असून अशुद्ध आणि गढूळ पाणी येत असल्याने ते सध्या देता येत नाही. पावसाळ्यामुळे पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणावर गाळ येत आहे. जलवाहिन्या नवीन आहेत. जोपर्यंत पाण्याची अपेक्षित गुणवत्ता मिळत नाही, तोपर्यंत पाणी दिले जाऊ शकत नाही.

वसईकरांना कधीपासून आणि किती पाणी मिळणार?

वसई विरारसाठी जरी १८५ दशलक्ष लिटर्स पाणी योजना असली तरी त्यापैकी २० दशलक्ष लिटर्स पाणी हे पालिका हद्दीबाहेरील गावांसाठी देण्यात येणार आहे. उर्वरित १६५ दशलक्ष लिटर्सपैकी ७० दशलक्ष लिटर्स पाणी वसईकरांना सप्टेंबरअखेरपर्यंत देण्यात येण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात पालिकेने अंथरलेल्या काशिदकपूर ते विरार फाटापर्यंतच्या जलवाहिनीची जलदाब चाचणी आणि वॉशआऊटचे काम केले होते. वसई फाट्यापर्यंत जलवाहिनीअंतर्गतचे काम माहे नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. त्यानंतर उर्वरित पाणी महापालिका टप्प्याटप्प्याने शहरात वितरित करणार आहे.

भविष्यातील योजना काय आहेत?

सध्या वसई विरार शहराला १४२ दशलक्ष लिटर पाण्याची तूट भेडसावत आहे; परंतु ही तूट पुढील काळात वाढत जाणार आहे. पालिकेने तयार केलेल्या अहवालानुसार २०२५ पर्यंत ही तूट १५३ दशलक्ष लिटर्स, २०४० मध्ये ३११ दशलक्ष लिटर आणि २०५५ पर्यंत ५१२ दशलक्ष लिटर तूट भेडसावणार आहे. २०५५ पर्यंत शहराची लोकसंख्या ४८ लाख होणार असल्याचा पालिकेचा अंदाज आहे. ही तूट कागदोपत्री असली तरी प्रत्यक्षात गळती आणि अन्य कारणामुळे ती जास्त असणार आहे. त्यामुळे वसई विरारसाठी दोन पाणी योजनांचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यातील खोलसापाडा टप्पा क्रमांक १ आणि २ मधून ६० दशलक्ष लिटर, तर देहर्जी धरणातून २५५ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. वरील धरण प्रकल्पांची कामे पाटबंधारे विभागामार्फत प्रगतिपथावर आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-09-2023 at 09:31 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×