वसई : यापूर्वी वसई विरार शहरात विद्युत खांब व तारा कोसळण्याच्या घटना घडत होत्या.मात्र आता थेट रोहित्र कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. गुरुवारी नायगाव मध्ये वादळीवाऱ्याने महावितरणचे रोहित्र कोसळले. या घटनेमुळे शहरातील धोकादायक स्थितीत असलेल्या रोहित्रांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महावितरणने रोहित्रांची तपासणी करावी अशी मागणी पुढे आली आहे.

वसई विरार शहरातील नागरिकांना वीज पुरवठा करण्यासाठी शहरात महावितरणतर्फे विविध ठिकाणी वीज रोहित्र ( ट्रान्सफॉर्मर) बसविली आहेत. सद्यस्थितीत शहरात ५ हजार ८४६ वीज रोहित्र असून त्यातून ग्राहकांना वीज वितरण करण्याचे काम सुरू आहे.मात्र शहरात बसविण्यात आलेली वीज रोहित्र सुरक्षित आहेत किंवा नाही याकडे दुर्लक्ष होत असल्याने वादळी वाऱ्याने रोहित्र कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. गुरुवारी नायगाव पश्चिमेच्या विजय पार्क परीसरात वादळीवाऱ्यामुळे महावितरणचे रोहित्र कोसळल्याची धक्कादायक घटना घडली.

सुदैवाने रस्त्यावर कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला.या घडलेल्या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. यापूर्वी वीज तारा तुटणे, खांब कोसळणे अशा घटना घडत होत्या आता थेट रोहित्रच कोसळत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. या घटनेनंतर शहरातील अन्य भागात असलेल्या रोहित्रांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

महावितरणने शहरात लावलेली रोहित्र व त्यांचे खांब हे सुरक्षित आहेत किंवा नाही याची तपासणी करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. वसई विरारचा बहुतांश परिसर हा किनार पट्टीचा भाग आहे. विशेषतः पावसाळ्यात वादळीवाऱ्यांची मोठी समस्या निर्माण होते. तसेच या भागात सतत खारे वारे वाहत असल्याने कधी कधी विद्युत खांब ही लवकर गंजतात याचा फटका बसण्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

मागील काही दिवसांपासून वसई विरार शहरात तारा तुटणे, विजेचा धक्का लागणे, रोहित्र पडणे अशा घटना घडत आहेत ही अतिशय चिंताजनक बाब असल्याचे वसई वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष जॉन परेरा यांनी सांगितले सांगितले. महावितरण अशा घटनांना गांभीर्याने घेत नाही याचाच हा परिणाम असल्याचा आरोप परेरा यांनी केला आहे.

नायगाव येथील रोहित्र बदलण्याकडे दुर्लक्ष

नायगाव मध्ये वादळीवाऱ्याच्या तडाख्याने महावितरणचे हे रोहित्र कोसळल्याची घटना घडून येथील नागरिकांचे विजेविना हाल झाले होते. ही घटना महावितरणच्या दुर्लक्षितपणामुळे घडली असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना हे रोहित्र बदलावे व याभागात नवीन विद्युत खांब बसवा अशी मागणी अनेकदा केली आहे. त्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते आशिष वर्तक यांनी सांगितले आहे. अशा घटना टाळण्यासाठी वीज वाहिन्या भूमिगत करा अशी मागणी वर्तक यांनी यावेळी केली.

महावितरणने दुरुस्तीचे काम पूर्ण करून तात्पुरता स्वरूपात बाजूच्या रोहित्रामधून वीज पुरवठा सुरू केला. याठिकाणी आता नवीन रोहित्र उभारणीचे नियोजन केले असून येत्या एक ते दोन दिवसात तो बसविला जाईल असे महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांनी सांगितले आहे.

महावितरणकडून रोहित्रांची तपासणी

नायगाव येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर महावितरण कडून शहरातील वीज व्यवस्थेची तपासणी सुरू करण्यात येणार आहे. शहरात विविध ठिकाणी असलेली रोहित्र व त्याला उभे करण्यासाठी लावण्यात आलेले विद्युत खांब, वीज वाहिन्या, उघडे डीपी बॉक्स अशी सर्व विद्युत उपकरणांची तपासणी करण्याचे निर्देश महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला बैठकीत देण्यात आले आहेत असे महावितरणचे कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी सांगितले आहे. जिथे जिथे धोकादायक स्थिती दिसून येईल ते त्यावर तातडीने उपाययोजना करा अशा सूचना त्यांना दिल्या असल्याचे मिश्रा यांनी सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्षमतेपेक्षा अधिक भाराचा ही फटका

वाढत्याव विजेच्या मागणीमुळे शहरात बसविण्यात आलेल्या रोहित्रांवर क्षमतेपेक्षा अधिक भार येत आहे.यामुळे डिओ जाणे, इतर तांत्रिक अडचण येऊन वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असतात. तर वीज गळती ही होत असते. तर काही वेळा जास्त भार येऊन शॉर्ट सर्किट होऊन रोहित्रांना आगी लागण्याच्या घटना घडतात. ते टाळण्यासाठी उपायोजना करा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.