वसई: वसईतील २० वर्षीय तरूणीच्या आत्महत्येला दीड महिना उलटूनही आरोपी मांत्रिक आणि त्याचा मुलगा मोकाट आहे. या प्रकरणात वसई पोलीस आरोपीला पाठिशी घालत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. सोमवारी त्यांनी वसई पोलीस ठाण्यात भेट दिली. या संपूर्ण प्रकरणाच्या कारवाईसाठी शेवटपर्यंत लढा उभारण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

वसईत राहणार्‍या रेवती निळे (२०) या तरुणीने २८ एप्रिल रोजी विष प्राशन करून आत्हमत्या केली होती. तिचा प्रियकर आयुष राणा याने तिला लग्नाला नकार दिला होता. तसेच मांत्रिक असलेले त्याचे वडील अजय राणा (५१) यांनी तिला तू खालच्या जातीची आहेस, कुंडलीत मृत्यूयोग आहे असे कारण दिले होते. या प्रकरणी वसई पोलिसांनी विलंबाने गुन्हा दाखल केला होता. मात्र आरोपींना अटक केले नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी वसई पोलीस ठाण्यात भेट दिली. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे, पोलीस आरोपींना पाठिशी घालत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. आत्महत्येनंतर ६ दिवस उलटूनही पोलिसांनी कारवाई केली नव्हती. त्यामुळे आरोपींना अतंरिम जामिन मिळाला होता. त्याच्या जामिनालाही पोलिसांनी विरोध केला नसल्याने आरोपी मोकाट आहेत असा आरोप दमानिया यांनी केला.

आरोपी हा तांत्रिक असून वसई किल्ल्यातील हनुमान मंदिरात अघोरी पुजा करतो. त्याचे आणि पोलिसांची संबंध असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांनी मयत मुलीच्या मोबाईल पंचनामा न करता ताब्यात घेतला आणि सर्व पुरावे नष्ट केले असाही आरोप त्यांनी केला. पोलिसांच्या संगनमतामुळेच आरोपी पिता-पुत्र दीड महिन्यांपासून मोकाट फिरत आहेत असेही त्या म्हणाल्या. या प्रकरणात कुणाचा राजकीय दबाव आहे ते तपासून काढा. संबंधित पोलिसांच्या दिरंगाईची चौकशी करा अशी त्यांनी मागणी केली. जो पर्यंत कठोर कारवाई होत नाही तो पर्यंत लढा देणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे प्रकरण?

पीडित तरूणी रेवती निळे (२०) ही वसईत राहत असून महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. तिचे आयुष राणा (२१) या तरूणासोबत मागील ४ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आयुष तिच्याच वर्गात शिकत होता. तो वसईच्या भास्कर आळीतील नादब्रम्ह सोसायटीत रहातो. या काळात लग्नाचे आमिष दाखवून आयुषने वारंवार तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले होते. मात्र नंतर लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर तो तिला टाळू लागला. त्याने रेवतीचा नंबरही ब्लॉक करून टाकला होता. त्यामुळे ती नैराश्यात होती. याबाबत तिने राणाच्या पालकांशी संपर्क केला. त्यावेळी त्यांनी हात वर केले. तुझ्या कुंडलीत मृत्यूयोग आहे तसेच तू खालच्या जातीची असल्याने माझ्या मुलाचे लग्न तुझ्याशी लावून देऊ शकत नाही असे आयुषच्या वडिल अजय राणा (५१) यांनी सांगितले. त्यामुळे २७ एप्रिल २०२५ रोजी तिने राहत्या घरात उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले होते. त्यानंतर २८ एप्रिल रोजी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.