एकच मार्गिका खुली, वाहतूक कोंडीची शक्यता
वसई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील भाईंदर खाडीवरील जुन्या वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रविवार २६ ते मंगळवार २८ सप्टेंबर असे तीन दिवस हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या पुलावरील एकच मार्गिका खुली ठेवण्यात येणार आहे. अवजड वाहनांना या दिवसांत प्रवेशाला बंदी असून त्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. एकच मार्गिका खुली राहणार असल्यामुळे या दिवसांत मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ हा गुजरात व मुंबईला जोडणारा महत्त्वाचा महामार्ग आहे. या मार्गावरून दररोज हजारोंच्या संख्येने वाहनांची वर्दळ असते. या महामार्गावर जुना वर्सोवा खाडी पूल आहे. जुना पूल असल्याने अधूनमधून त्याची दुरुस्ती केली जाते. त्यातच याच पुलाच्या बाजूला सुरू असलेल्या नवीन वर्सोवा पुलाचे कामही पूर्ण झाले नाही. त्यामुळे जी काही वाहतूक सुरू आहे ती जुन्याच पुलावरून सुरू आहे. या जुन्या पुलाच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देणेही तितकेच महत्त्वाचे असून वाहनचालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या पुलाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. महामार्ग प्राधिकरण व आयआरबी यांच्या मार्फत पुलाची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे या पुलाच्या कामासाठी सलग तीन दिवस पुलाची एक मार्गिका बंद करण्यात येणार आहे. केवळ एकच मार्गिकेचा वापर सुरू राहणार आहे. ठाणे व मुंबईच्या बाजूने पालघर-गुजरात बाजूकडे जाणारी अवजड व हलकी वाहने एकाच वेळी एकाच मार्गिकेवरून सोडल्यास वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
पुलावरून वाहतूक करणारे जड-अवजड वाहने ही दुसऱ्या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उप-आयुक्त विजयकांत सागर यांनी दिली आहे. तसेच या मार्गिकेवरून केवळ हलक्या वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे.तर दुसरीकडे नीराकेंद्र व गायमुख या ठिकाणाहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना वर्सोवा पुलाकडे जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यांची वाहतूक इतर तीन पर्यायी मार्गावर वळविण्यात आली आहे.
अवजड वाहनांना पर्यायी मार्ग
- ठाणे शहर हद्दीतून वर्सोवामार्गे पालघर बाजूकडे येणारी जड-अवजड वाहने.
- मुंब्रा – खारेगाव टोलनाका -मानकोली -भिवंडी -वाडा -मनोर पालघरमार्गे इच्छुक स्थळी जाण्याचा पर्यायी मार्ग
- मुंब्रा – खारेगाव टोलनाका- मानकोली- भिवंडी- नदी नाका- अंबाडी- वर्जेश्वरी गणेशपूरी- शिरसाट फाटा मार्गे जाण्याचा पर्यायी मार्ग
- मुंब्रा-खारेगाव टोलनाका -मानकोली -अंजूर फाटा कामण चिंचोटी वसई विरार
अत्यावश्यक सेवेतील वाहनांना मुभा
पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी जड-अवजड वाहनांना प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. असे जरी असले तरी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या मार्गिकेवरून प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे. यात रुग्णवाहिका तसेच महसूल विभाग, पोलीस आणि अग्निशमन दलाची वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने यांचा समावेश आहे.
जुन्या वर्सोवा पुलाचे दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने वाहनांचा प्रवास हा एकाच मार्गिकेवरून होणार आहे. त्यामुळे २६ ते २८ सप्टेंबर या तीन दिवस या पुलावर जड- अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
– विजयकांत सागर, पोलीस उप-आयुक्त वाहतूक विभाग