वसई : विरारच्या मनवेलपाडा येथे २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने केलेल्या आत्महत्या प्रकरणी विरार पोलिसांनी एकूण ७ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. अन्य दोन फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहीती पोलिसांनी दिली आहे.

नेमके प्रकरण काय ?

२० वर्षीय तरुणी ही विरार पूर्वेच्या नाना नानी पार्क मधील शिव शंभो अपार्टमेंट मध्ये रहात होती. ती विवा महाविद्यालयात बी कॉमच्या शेवटच्या वर्गात शिकत होती. या महाविद्यालयात येणार्‍या एका तरूणाशी तिचे प्रेमसंबंध होते. हा मुलाने तिची अश्लील छायाचित्रे काढली होती. त्यामुळे ती व्यथित होती. याबाबत तिच्या वडिलांनी विचारणा केल्यावर तिने हा प्रकार सांगितला.  त्यांनतर तरुणीचे वडील महाविद्यालयात गेले आणि संबंधित मुलाला जाब विचारला.

मुलगा बाहेरून काही मुले घेऊन आला आणि मुलीच्या वडिलांनाच मारहाण केली. हा प्रकार तिला सहन झाला नाही. त्यामुळे तिने १३ ऑक्टोबर चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले होते.

पाच जणांना केली अटक …

या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात ७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी आता अमित प्रजापती, शिवा मदेसिया, राकेश पाल, कृष्णा गुप्ता यांना अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीला भिवंडी येथील बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. इतर दोन आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आत्महत्येच्या घटनांमुळे खळबळ

वसई विरार शहरात मागील महिना भरापासून विविध ठिकाणच्या भागातून आत्महत्या झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. आता घडलेल्या आत्महत्येच्या बहुतांश घटनेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. अशा वाढत्या घटनांमुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.