वसई / भाईंदर: विरार ते मिरारोड या दरम्यानच्या रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विविध प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अजूनही रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधांची वानवा आहे. याचा फटका दैनंदिन प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. याबाबत तक्रारी करूनही त्यावर योग्य त्या उपाययोजना आखल्या जात नसल्याने प्रवाशांमध्ये संताप खदखदत आहे.
विरार ते मिरारोड अशी जवळपास २८ ते ३० किलोमीटरच्या हद्दीत विरार, नालासोपारा, वसई, नायगाव, भाईंदर आणि मीरा रोड अशा सहा स्थानकाचा समावेश होतो. या रेल्वे स्थानकातून दररोज जवळपास २० ते २५ लाख इतके प्रवासी विरार ते चर्चगेट असा प्रवास करतात. यात नोकरदार वर्ग, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी यासह इच्छित ठिकाणी जाणारे प्रवासी यांचा समावेश आहे.
मात्र रेल्वे स्थानकात वाढत्या गर्दीसोबतच विविध प्रकारच्या समस्या ही वाढू लागल्या आहे. रेल्वे स्थानकात प्रवेश करताना व रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना फेरीवाले, रिक्षा व अनधिकृत वाहने पार्किंग यांच्या गराड्यातून प्रवाशांना ये जा करावी लागते. विशेषतः आता विविध ठिकाणच्या रेल्वे स्थानकात फलाटावर विविध प्रकारची विकास कामे सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना फलाटावर उभे राहण्यास अडचणी येत आहे.
निर्माणाधिन असलेल्या कामांचे कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने आडवे पडलेले लोखंडी खांब, काढून ठेवलेले पत्रे यामुळे गर्दीतून चढ- उतर करताना अपघात होण्याची शक्यता असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
विरार रेल्वेस्थानकातील फलाट क्र. ३ अ आणि ४ अ वर कोणताच पादचारी पूल उतरत नाही. त्यामूळे दोन्ही फलाटांवरुन बाहेर पडण्यासाठी पुर्ण फलाट चालून फलाट क्र. ३ व ४ च्या दिशेने बाहेर पडावे लागते. तिथे काम सुरु असल्याने अपघताचा धोका संभवतो असे रेल्वे प्रवासी संघटनेचे हितेश सावे यांनी सांगितले आहे.
नालासोपारा हे सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून ओळखले जाते. जवळपास ७० टक्के प्रवासी हे नालासोपारा येथून चढ-उतार करत असतात. मात्र बाहेर पडण्याचे व ये जा करण्याचे मार्ग अपुरे असल्याने चेंगराचेंगरी सारखी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्वेच्या भागात शौचालय नसल्याने येथील प्रवासी उतरून जिन्याच्या खालील बाजूस व त्याला लागूनच असलेल्या मोकळ्या जागेत लघुशंका करतात. त्यातून रेल्वे स्थानक परीसरात दुर्गंधी पसरू लागली आहे.
तर गजबजलेल्या वसई रेल्वे स्थानकात ही विविध प्रकारच्या समस्या जाणवत आहेत. विशेषतः फलाट क्रमांक १ वर वारंगणानांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. अशा ठिकाणाहून ये जा करताना प्रवाशांना अडचणी येत असतात. विशेषतः महिला वर्गाची मोठी अडचण होते. मात्र अजूनही हा वावर थांबला नसल्याने एकप्रकारे हा फलाट गर्दुल्ले व वारांगना यांचा अड्डाच बनला असल्याचे चित्र आहे.तसेच रेल्वे स्थानकातील कामे अर्धवट अवस्थेत असल्याने तेथून ये जा करताना प्रवाशांना अडचणी येत आहेत. तसेच स्थानकाला लागूनच स्कायवॉक आहे त्यावर ही गर्दुल्ले असल्याने अनेक प्रवासी येथून ये जा करणे टाळत आहेत.
चर्चगेटहून विरारला जाणारी लोकल वसई स्थानकात फलाट क्रमांक २ किंवा मग फलाट क्रमांक ४ वर येऊन थांबते. पण, फलाट क्रमांक ४ आणि लोकल मध्ये अंतर आहे. त्यामुळे प्रवाशाचा पाय फलाट आणि लोकलच्या फटीत अडकून अपघात होण्याची शक्यता यामुळे संभवते.
नायगाव रेल्वे स्थानकात ही शौचालयाचा अभाव, भुयारी मार्गात घाणीचे साम्राज्य, भटक्या श्वानांचा त्रास, अपुऱ्या तिकीट खिडक्या, सातत्याने बंद असलेले सरकते जिने अशा अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत असे महिला रेल्वे प्रवासी मृदुला खेडेकर यांनी सांगितले आहे. प्रवाशांच्या सोयी व सुरक्षित प्रवसाच्या दृष्टीने आम्ही वेळोवेळी रेल्वेकडे ऑनलाइन स्वरूपात तक्रारी करीत असतो मात्र हव्या त्या प्रमाणात लक्ष दिले जात नसल्याने समस्या वाढतच आहेत असेही त्यांनी सांगितले आहे. मिरा रोड ते विरार या दरम्यान रात्रीच्या सुमारासही महिला प्रवासी प्रवास करतात. यासाठी प्रत्येक स्थानकावर पोलीस गस्त ही अधिक प्रमाणात वाढविणे गरजेचे आहे असे खेडेकर यांनी सांगितले आहे.
भाईंदर व मिरारोड स्थानकात ही समस्या
पश्चिम रेल्वे मार्गावरील भाईंदर आणि मिरा रोड ही दोन्ही महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत. या स्थानकांवरून दररोज एक लाखाहून अधिक नागरिक प्रवास करतात. मात्र, प्रवाशांच्या संख्येनुसार आवश्यक त्या मूलभूत सुविधा येथे उपलब्ध नाहीत.प्रवाशांना रेल्वे स्थानकावर पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. स्थानक परिसर फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाने वेढलेला असून, त्यामुळे पादचाऱ्यांना मार्गक्रमण करणे अवघड होते.
याशिवाय, स्थानक परिसरात रिक्षाचालकांची बेशिस्त वर्दळ आणि अनधिकृत वाहनतळामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते.या वाढत्या समस्यांमुळे प्रवाशांचा मोठा मनस्ताप होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांनी संयुक्तपणे विशेष मोहीम राबवून स्थानक परिसरातील फेरीवाले, अनधिकृत वाहनतळ आणि वाहतूक अडथळे दूर करावेत, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवासी संघटनांकडून होत आहे.
रेल्वे गाड्याची कमतरतात ही प्रमुख समस्या आम्हाला जाणवते. अनेक वेळा लवकर येऊन देखील गाड्यामध्ये चढण्यास भेटत नाही. त्यामुळे प्रवासी संख्येचा आढावा घेऊन, भाईंदरहुन सुटणाऱ्या गाड्यामध्ये वाढ झाली पाहिजे असे रेल्वे प्रवासी प्रफुल्ल कासारे यांनी सांगितले आहे.
रेल्वे स्थानकावर महिलांसाठी कोणतीच सुविधा उभारण्यात आलेली नाही. शौचालय देखील नसल्यामुळे गरजेचे वेळी मोठी तारांबळ उडत असते. शिवाय स्थनकावर टवाळखोर मुलाचा वावर असल्याने अडचणी येतात असे महिला प्रवासी आयुषी पुजारी यांनी सांगितले आहे.
विरार स्थानकातील समस्या
१) फलाट क्र. ५/६ आणि फलाट क्र.१ ज्यांचा वापर तुलनेने कमी आहे अशा फलाटांवरच सरकते जिने आहेत (एस्कलेटर्स) आहेत. वरदळीच्या फलाटांवर सरकते जिने नाही.
२) विरार स्थानकातील पूर्वेकडे उतरणाऱ्या पादचारी पुलासमोर रिक्षा पादचार्यांचा मार्ग अडवून उभ्या असतात. एखाद्या आपत्कालिन स्थितीमधे अशा वेळी चेंगराचेंगरी ची शक्यता आहे.
३) विरार स्थानकातील स्वच्छता हा ऐरणीचा मुद्दा आहे. अस्वच्छ स्टाॅल्स तर आहेतच परंतू फलाटावरची स्वच्छताही आक्षेपार्ह आहे. गर्दुल्ले, भटके श्वान इत्यादिंचा वावर असल्याने फलाटावर व पादचारी पुलांवर सकाळच्या सुमारास प्राण्यांची व माणसांची विष्ठा सर्रास नजरेत पडते. गर्दीच्या वेळी ही घाण चुकवत चालणे जिकरीचे असते.
४) पावसाळ्यात गळकी छपरे, सखल जागी साचलेले पाणी, फुटलेल्या फरशा व त्यावर पाय दिल्यावर अंगावर चिखल उडतो.
वसई स्थानकातील समस्या
१) फलाट क्रमांक ५ वर सरकत्या जिन्याचे काम सुरू आहे. मात्र प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना नाही.
२) स्थानकातील पायऱ्यांवर पानाच्या पिचकाऱ्यांमुळे अस्वच्छता.
३) वसई पूर्व -पश्चिम स्थानकाबाहेर फेरीवाले आणि रिक्षावाल्यांमुळे पादचाऱ्यांचे हाल
४) फलाट क्रमांक ५ वर नव्याने बांधण्यात आलेली प्रसाधनगृह २ महिन्यांपासून बंद.
५) फलाट क्रमांक ५,६ आणि ७ वर अर्ध्या भागात छत नाही.
६, आणि ७ वर विविध अर्धवट कामांमुळे प्रवाशांची गैरसोय.
नालासोपारा स्थानकातील समस्या
१) नालासोपारा स्थानकाच्या बाहेरच दुर्गंधीचे साम्राज्य तयार झाले आहे.
२) नालासोपाऱ्यात एकाच ठिकाणी शौचालय आहे दुसऱ्या ठिकाणी नाही त्यामुळे प्रवाशांना अडचणी निर्माण होतात.
३) नालासोपारा पश्चिमेच्या भागात स्थानकातून बाहेर पडताच घाणीचे साम्राज्य
४) स्थानकातील वाढती गर्दीच्या तुलनेत बाहेर पडण्याचे मार्ग अरुंद आहेत. त्यामुळे चेंगराचेंगरीची शक्यता आहे.
५) सरकत्या जिन्यांचा अभाव
नायगाव रेल्वे स्थानकातील समस्या
१) बसविलेले सरकते जिने सातत्याने बंद पडण्याचे प्रकार
२) तिकीट खिडक्या अपुऱ्या आहेत. त्यामुळे तिकीट काढताना प्रवाशांना रांगा लावाव्या लागत आहे.
३) भुयारी मार्गात पावसाळ्यात पावसाचे पाणी साचणे, अस्वछता, श्वानांचा उपद्रव
४) भुयारी मार्गातून बाहेर पडण्याच्या मार्गात वाहने पार्किंग
५) फलाट क्रमांक ४ वर छप्पर नाही
६) शौचालय केवळ एकाच ठिकाणी आहे. आणि आहे त्या शौचालय व स्वच्छता गृहांची निगा राखली जात नाही
भाईंदर रेल्वे स्थानकावरील समस्या
१-शौचालयाचा अभाव
२- जिन्याची रचना असमान, उतरताना पडण्याची भीती
३-स्तनपान कक्ष वापरण्यायोग्य नाही
४-सामान उचलण्यासाठी कुली नाही.
५-अनेकवेळा सरकते जीने बंद असणे
६- अर्धवट सोडण्यात आलेल्या बांधकामाचा प्रवाशांना फटका
मिरा रोड रेल्वे स्थानकावरील समस्या
१- शौचालयाची गैरसोय
२- स्थानक परिसरात तसेच पादचारी पुलाला फेरीवाल्यांचा विळखा
३-भिकाऱ्याचा वावर अधिक
४- छप्पर गळती मुळे पावसाळ्यात प्रवाशांना त्रास
५-महिलांसाठी स्वतंत्र सुविधा नाही
६-स्वच्छतेकडे दुर्लक्ष, सर्वत्र घाणीचे साम्राज्य.