वसई: वसई विरार शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेच्या परिवहन विभागाकडून ई बस सेवेत उतरविण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी पालिकेने वसई, भुईगाव व किल्लाबंदर या मार्गावर ११ ई बस सुरू केल्या आहेत.

वसई विरार शहरात पालिकेच्या परिवहन विभागाकडून बस सेवा दिली जाते.शहराच्या वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेने या बसेस सुद्धा अपुऱ्या पडत आहे. तर काही ठिकाणच्या मार्गावर ही बसेस कमी फेऱ्या असल्याने प्रवाशांची फारच गैरसोय होत असते.

प्रवाशांना चांगली सुविधा उपलब्ध व्हावी व शहरातील प्रदूषण कमी व्हावे व पर्यावरण संतुलन राखले जावे यासाठी पालिकेने विद्युत बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत या ई बस खरेदी केल्या आहेत. सद्यस्थितीत पालिकेच्या परिवहन विभागात ४० ई बस दाखल झाल्या आहेत. त्यातील निम्म्या बसेस या रस्तावर सुरू होत्या.

आता अन्य ठिकाणच्या मार्गावर ही ई बस सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी नागरिक तसेच वसईच्या आमदार स्नेहा दुबे -पंडित यांनी केली होती. त्यानुसार वसई- भुईगाव, वसई किल्ला बंदर व जेट्टी बंदर या मार्गावर ई बस सुरू करण्यात आल्या आहेत. सोमवारी या बससेवेचा शुभारंभ आमदार स्नेहा दुबे-पंडित यांच्या शुभहस्ते पार पडला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त शनानासाहेब कामठे, माजी नगरसेवक शेखर धुरी,किरण भोईर, महेश सरवणकर, सहायक आयुक्त संगीता घाडीगावकर, विश्वनाथ तळेकर व इतर पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. ई-बस सेवा ही पर्यावरणपूरक तंत्रज्ञानावर आधारित असून, स्वच्छ, सुरक्षित आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव नागरिकांना देणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे.

अशी असेल ई बस सेवा

वसई भुईगाव , वसई किल्लाबंदर व जेट्टी बंदर अशा मार्गिकेवर ई बस चालविल्या जाणार आहेत. भुईगाव ४ ई बस असून दिवसाला ४८ फेऱ्या, किल्लाबंदर ५ ई बस असून ६० फेऱ्या आणि जेट्टीबंदर २ ई बस द्वारे २४ फेऱ्या चालविल्या जाणार आहेत. मात्र ई बस चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग केंद्र जवळ नसल्याने त्या विरार येथे घेऊन जाव्या लागणार आहेत.

प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न

यापूर्वी या मार्गावर डिझेल वर चालणाऱ्या बस चालविल्या जात होत्या. काही बस जुन्या झाल्याने त्यातून काळा धूर बाहेर पडून प्रदूषण निर्माण होत होते. प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने त्या बस कमी करून आता त्याजागी ई बस सेवेत आणल्या जात आहेत. टप्प्या टप्प्याने या ई बस सर्व मार्गावर सुरू केल्या जाणार आहेत.