मिरा रोड येथे भर रस्त्यात एका महिलेची तिच्या पतीने चाकूने गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या करण्यात आली. अमरीन खान (३६ ) असे मयत महिलेचे नाव आहे. हत्येनंतर तिच्या पतीने पोलिसांकडे आत्मसमर्पण केले.

वांद्रे येथे राहणाऱ्या अमरीनचे मिरा रोड येथे राहणाऱ्या नदीम खान सोबत लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. मागील दीड वर्षांपासून अमरीनचे नदीम खान बरोबर कौटुंबिक वाद सुरु होते. आपल्या दोन मुलांचा ताबा मिळावा म्हणून तिने ठाणे सत्र न्यालयात दावा दाखल केला होता. त्यावरून न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात मुलांचा ताबा अमरीनला दिला होता. मात्र पती नदीम मुलांचा ताबा देण्यास तयार नसल्याने तिने पुन्हा न्यायालयात तक्रार केली होती. त्यावरून मुलांचा ताबा घेण्यासाठी सुरक्षा प्रदान करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले होते.

हेही वाचा >>> वसईत मद्यपी तरुणाचा प्रताप,पोलिसांनी अडवताच दुचाकी पेटवली

त्यानुसार शुक्रवारी मुलांचा ताबा घेण्यासाठी अमरीन मिरा रोडला आली होती. दुपारी बाराच्या सुमारास ती पोलीस ठाण्याच्या बाहेर पडताच  पती नदीम खानने चाकूने गळा चिरून तिची हत्या केली आणि  पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला, अशी माहिती उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली आहे.

अमरीनला पोलीस  सुरक्षा प्रदान करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार अमरीनने नया नगर पोलीस ठाण्यात गुरुवारी ७ हजार रुपये अनामत रक्कम भरून सुरक्षा घेतली होती. गुरुवारी पोलिसांसह ती पतीच्या घरी गेली असता घराला कुलूप लावलेले होते. मुलगा हा आपल्या आजी सोबत अजमेरला गेला असल्याचे पतीने पोलिसांना फोनवर सांगितले होते. त्यामुळे महिला निराश होऊन घरी परतली  होती.

हेही वाचा >>> आई मला घरी घेऊन चल… विरहाच्या वेदनेने अनाथाश्रमातील चिमुकल्याची आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुक्रवारी सकाळी अमरीन पुन्हा नया नगर पोलीस ठाण्यात आली होती. यावेळी पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे आमदार गीता जैन आणि उपायुक्त प्रकाश गायकवाड यांची भेट मिळेल या आशेने महिला पोलीस ठाण्यात बाहेर बसून होती. दरम्यान ती स्वतः मुलांना बघण्यासाठी पोलीस ठाण्याजवळच असलेल्या एन एच स्कूलमध्ये  जाण्यासाठी निघाली होती. मात्र बाहेर पडताच बाहेर उभ्या असलेल्या नदीम खानने तिच्यावर हल्ला करून हत्या केली.