भाईंदर: मीरा भाईंदर शहरातील अंतर्गत पाणी वितरण व्यवस्थेचे काम केंद्र सरकारच्या अमृत योजनेमार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

मीरा भाईंदर शहराची लोकसंख्या १४ लाखांहून जास्त आहे. शहराला दररोज २१६ दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज आहे. शहराला सध्या स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन् स्ट्रक्चर कंपनी प्रा.लि. यांच्याकडून ८६ दशलक्ष लिटर आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १२५ असा एकूण २११ दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा केला जातो. परंतु पाण्याच्या गळतीमुळे प्रत्यक्षात केवळ १९० दशलक्ष लिटर इतकेच पाणी मिळते. म्हणजेच दररोज शहराला २५ ते ३० दशलक्ष लिटर पाण्याची तूट भासते. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वसई विरार आणि मीरा भाईंदर महापालिकेसाठी सूर्या पाणी प्रकल्पातून ४०३ दशलक्ष लिटर पाणी घेण्याची योजना आखली होती. त्यातील २१८ दशलक्ष लिटर पाणी मीरा- भाईंदर शहराला मिळणार आहे.

पालिकेने २०१९मध्ये या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तांत्रिक मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सादर केलेला होता, मात्र त्याला मंजुरी मिळत नव्हती.त्यानंतर गेल्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासाठीच्या निधीची तरतूद करण्यात आली होती, मात्र राज्यात नवे सरकार आल्यानंतर काही कामे केंद्र शासनाच्या निधीतून पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मीरा भाईंदर शहराच्या अंतर्गत जलवाहिनीची कामे जलद गतीने होणे गरजेचे आहे. यामुळेच गेल्या अधिवेशनात मी केलेल्या मागणीनुसार राज्य शासनाने ४७३ कोटींच्या प्रकल्प अहवालास मंजुरी दिली होती. मात्र आता हे काम अमृत योजनेतून केले जाणार आहे. काम कोणत्याही शासनाकडून पूर्ण करण्यात यावे. परंतु ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे याकरिता मी पाठपुरावा करत राहीन, असे आमदार गीता जैन यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या अंतर्गत शहरातील जलवाहिन्या वितरणाचे काम आता राज्य शासनाच्या निधीतून न करता केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून पूर्ण केले जाणार आहे. -दिलीप ढोले, आयुक्त, मीरा-भाईंदर महापालिका