वसई : शहरात मागील काही दिवसांपासून एका पाठोपाठ एक आत्महत्येच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. प्रेमी जोडप्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी सकाळी नालासोपारा पश्चिम येथील नाळे गावातील बेणापट्टी गावात ही घटना घडली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

२० वर्षीय तरुण हा अर्नाळा येथील सहजीवन पाडा परिसरात राहत होता. त्याचे नाळा बेणापट्टी मधील एका तरुणीशी प्रेमसंबध होते. बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास नाळे येथील मुलीच्या घराजवळ दोघेही मृतावस्थेत आढळले. त्यांच्या तोंडातून फेस येत होता. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोघांना मयत घोषीत केले. त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली असावी अशी शक्यता नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी यांनी व्यक्त केली आहे.

पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल असून या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलीसांनी सांगीतले आहे.

प्रेमप्रकरणातून आत्महत्या

शहरात मागील काही दिवसांपासून आत्महत्येच्या घटना वाढल्या आहे. मागील दहा दिवसांत तीन आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तीन तरुण व दोन तरुणींचा समावेश आहे. या तिन्ही घटना प्रेम प्रकरणातून झाल्या आहेत आहे. सातत्याने अशा घटना समोर येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.